Viral video of a street vendor washing corn in gutter water at Thane: शहरातील जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये एका विक्रेत्याकडून गटारातून वाहणाऱ्या पाण्यात मक्याची कणसे धुतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाजारात धाव घेत संबंधित विक्रेत्याला जाब विचारत चोप दिला.
जांभळी नाका ही ठाण्यातील प्रमुख घाऊक भाजी बाजारपेठ असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळांची खरेदी-विक्री होते. किरकोळ विक्रेत्यांसह सर्वसामान्य नागरिकही स्वस्त दरात भाजी मिळत असल्याने या बाजारात खरेदीसाठी येतात. अशा ठिकाणी अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वैशाली हॉटेलसमोरील परिसरात एक विक्रेता रस्त्यालगत गटारातून वाहणाऱ्या पाण्यात मक्याची कणसे धुत असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होताच नागरिकांकडून संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या प्रकाराची माहिती मिळताच मनसेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारत चोप दिला. या घटनेमुळे काही काळ बाजार परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित नागरिकांनीही अन्नपदार्थांच्या स्वच्छतेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. यापूर्वीही भाजीपाला अधिक ताजा आणि आकर्षक दिसावा यासाठी काही विक्रेत्यांकडून कृत्रिम हिरव्या रंगाचा वापर केल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय होते?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जांभळी नाका परिसरात, वैशाली हॉटेलसमोरील भागात एका विक्रेत्याकडून मक्याची कणसे रस्त्यावरून वाहणाऱ्या, गटारासारख्या पाण्यात धुतली जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्यक्त होत होती.
