ठाणे : कॅडबरी जंक्शन परिसरात थुंकल्याचा जाब विचारल्याने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला प्रवासी वाहतूक कार चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर ठाण्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह विवियाना मॉल परिसरात जाऊन ओला-उबेर चालकांना इशारा दिला. यावेळी काही चालकांसोबत वादावादी झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.
कॅडबरी जंक्शन येथील ज्युपिटर रुग्णालयाजवळील गृहसंकुलात राहणारे पारशी समाजातील वृद्ध दाम्पत्य मंगळवारी रात्री परिसरातून पायी जात होते. त्यावेळी निशांत शुक्ला (वय ४०) हा प्रवासी वाहतूक कार चालक वाहनातून बाहेर थुंकत असल्याचे पाहून वृद्धांनी त्याला जाब विचारला. यावरून संतप्त झालेल्या चालकाने वृद्धांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच पदपथालगत पडलेला दगड उचलून हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या मारहाणीत वृद्ध जखमी झाले. घटनेदरम्यान उपस्थित काही नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. दरम्यान, ७० वर्षांहून अधिक वयाच्या वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी निशांत शुक्ला याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. वृद्ध व्यक्ती तक्रार देण्यास पुढे न आल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी नितेश पाटोळे यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर अविनाश जाधव कार्यकर्त्यांसह विवियाना मॉल परिसरात पोहोचले. तेथे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या ओला-उबेर चालकांची चौकशी करण्यात आली. काही चालकांनी उद्धटपणे उत्तरे दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला. तसेच महाराष्ट्रात येऊन दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव म्हणाले, “महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत. रिक्षाचालकांना मराठी भाषा येणे आवश्यक आहे आणि स्थानिक युवकांनाच रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. काल एका ज्येष्ठ नागरिकाने रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला म्हणून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत आहेत. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवली पाहिजे. काही दिवसांपूर्वी ठाणे मार्केट परिसरातही काही परप्रांतीयांनी एका ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती. अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास महाराष्ट्राचे बिहार होण्यास वेळ लागणार नाही. या प्रवृत्तींना योग्य वेळी रोखण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल.
