ठाणे : ठाणे शहरात मंगळवारप्रमाणेच बुधवारीही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत मुंब्रा, राबोडी आणि बाळकुम परिसरात गॅलरी कोसळणे, खोलीतील प्लास्टर पडणे आणि कंपाउंडची पत्रे उडण्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून यात एका तरुणाला दुखापत झाली आहे. यामुळे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

ठाणे शहरात पावसाच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. गेल्या २४ तासांत मुंब्रा, राबोडी आणि बाळकुम परिसरात तीन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या असून एका तरुणाला दुखापत झाली आहे. पहिली घटना मुंब्रा येथील अमृतनगर गेटसमोरील चांदणी इमारतीत घडली. सुमारे ३० ते ३४ वर्षे जुन्या तळ अधिक चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूम क्रमांक ४०१ ची गॅलरी तिसऱ्या मजल्यावर कोसळली.

गॅलरीचा काही भाग खाली चहाची टपरी चालवणारे अब्दुल रहमान शेख (२४) यांच्या डोक्यावर पडल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. संबंधित इमारत ”सी-२ ए” प्रवर्गातील असल्याने ती तात्पुरती रिकामी करून रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परिसरात धोकापट्टीही बांधण्यात आली आहे.

दुसरी घटना राबोडी येथील साईदीप कॉम्प्लेक्समध्ये घडली. सुमारे ३० वर्षे जुन्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील एका घराच्या हॉलमधील प्लास्टर आणि पीओपी सिलिंग अचानक कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित घर पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून तेथे राहणाऱ्या पाच जणांनी तात्पुरता नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. या इमारतीत सुमारे ६० रहिवासी वास्तव्यास आहेत.

तिसरी घटना बाळकुम येथील दोस्ती रेंटल परिसरात घडली. इमारतीच्या कंपाउंडसाठी लावण्यात आलेली लोखंडी पत्रे जोरदार वाऱ्यामुळे वाहनांवर पडली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने गॅस कटरच्या सहाय्याने पत्रे हटवून परिसर सुरक्षित केला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही तसेच वाहनांचेही नुकसान टळले. तीन्ही घटनांनंतर अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आवश्यक उपाययोजना केल्या. या घटनामुळे शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.