ठाणे – पावसाळ्यात पूर, अतिवृष्टी, जलजन्य आजार आणि साथीच्या रोगांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापनाची व्यापक तयारी सुरू केली आहे. जिल्हाभरात २४ तास नियंत्रण कक्ष, जलद प्रतिसाद पथके, विशेष वैद्यकीय पथके आणि आवश्यक औषधसाठा सज्ज ठेवण्यात आला असून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

पावसाळी हंगामात संभाव्य नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सन २०२६-२७ साठी सविस्तर आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार केला आहे. जिल्हास्तरावर तीन जलद प्रतिसाद पथके (आरआरटी) वाहनांसह २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टरांचे विशेष प्रतिसाद पथकही तयार ठेवण्यात आले आहे. आपत्तीच्या काळात समन्वय साधण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य व संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावपातळीवर नियमित सर्वेक्षण केले जात आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांकडे पाठविले जाणार आहेत. त्याचबरोबर जलस्रोतांची स्वच्छता आणि पाणी शुद्धीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांच्या नियंत्रणासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य रुग्णसंख्या वाढ लक्षात घेऊन औषधसाठा, इंजेक्शन्स, वैद्यकीय उपकरणे आणि आपत्कालीन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साथरोग नियंत्रण कक्ष तयार ठेवण्याबरोबरच रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, प्रथमोपचार साहित्य आणि मेडिसिन किट सज्ज ठेवण्यात आले आहेत. पूरग्रस्त किंवा बाधित भागांमध्ये तातडीने आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी वाहन व्यवस्थाही उपलब्ध करण्यात आली आहे.

मान्सून काळातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून नियमित अहवाल जिल्हास्तरावर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गर्भवती माता, बालके, ज्येष्ठ नागरिक आणि विशेष गरज असलेल्या नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. मान्सूनमध्ये संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या दुर्गम गाव-पाड्यांतील आशा सेविकांकडे पुरेसा औषधसाठा ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असून आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे. – रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी