ठाणे : जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने घेतलेल्या खंडामुळे ठाणे जिल्ह्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. काही दिवस गारठा, त्यानंतर अचानक वाढलेला उकाडा आणि दमट वातावरण याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला असून, जिल्ह्यात सर्दी, घसा खवखवणे, घसा दुखणे, खोकला, ताप आणि संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडीसह विविध शहरांतील खासगी दवाखाने आणि लहान क्लिनिकमध्ये अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. सलग अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने दिवसाच्या वेळी कडक ऊन आणि दमट वातावरण जाणवू लागले, तर सकाळ आणि रात्री तुलनेने गारवा कायम राहिला. या सतत बदलणाऱ्या हवामानाशी शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ लागत असल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर घसा खवखवणे, घसा दुखणे, कोरडा किंवा कफयुक्त खोकला, शिंका, ताप, अंगदुखी आणि अशक्तपणा अशा तक्रारी घेऊन रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या व्यक्तींमध्ये या तक्रारी अधिक प्रमाणात आढळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

थंड वातावरणानंतर अचानक वाढलेली उष्णता आणि आर्द्रता यामुळे घशातील श्लेष्मल त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे घसा खवखवणे, गिळताना त्रास होणे, आवाज बसणे आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो. यासोबतच अपुरी झोप, कमी पाणी पिणे, थंड पेयांचे अतिसेवन आणि एसीमधून वारंवार बाहेर पडणे यामुळेही संसर्गाचा धोका वाढतो.

डॉक्टरांनी नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, भिजल्यानंतर त्वरित कोरडे कपडे परिधान करणे, थंड पदार्थांचे अतिसेवन टाळणे तसेच ताप किंवा घसा दुखण्याची लक्षणे दोन-तीन दिवसांपेक्षा अधिक काळ कायम राहिल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढण्याची शक्यता

जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक भागांत पाणी साचले आहे. त्यानंतर पावसाने काही दिवस खंड घेतल्याने हे पाणी अनेक ठिकाणी तसेच साचून राहिले असून, त्यामुळे डासांची पैदास होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी शक्यता जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.

नागरिकांनी घराच्या परिसरात, गच्चीवर, टायर, कुलर, फुलदाण्या, पाण्याच्या टाक्या किंवा इतर कोणत्याही भांड्यात पाणी साचू देऊ नये. परिसर स्वच्छ ठेवावा, डासांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि ताप, अंगदुखी किंवा इतर संशयास्पद लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

वातावरणातील बदल हे निश्चितच आजाराचे कारण ठरतात. पावसाने घेतलेली उसंत ही साथीच्या आजारासाठी पोषक वातावरण आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. घरात अथवा परिसरात लहान मोठी पाण्याची डबकी तयार होऊ देऊ नका. जेणेकरून डेंग्यू सारखे इतर डास तयार होणार नाही.

  • डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकीत्सक, ठाणे</strong>