ठाणे: पावसाळा सुरू झाला की ठाणे जिल्ह्यातील दुर्गम, डोंगराळ आणि आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या गरोदर मातांसमोर प्रसूती काळातील उपचाराचा प्रश्न अधिक गंभीर बनतो. यावेळी या दुर्गम भागातील गरोदर मातांना वेळीच उपचार मिळावे यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून येत्या काही काळात प्रसूती होणार असलेल्या मातांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे.

जोखीमग्रस्त गावपाड्यांमध्ये राहणाऱ्या १२६ गरोदर मातांचे सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. प्रत्येक गरोदर मातेसाठी स्वतंत्र आरोग्य आराखडा तयार करण्यात आला असून प्रसूतीपूर्व संदर्भ सेवा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य केंद्रांची माहिती आणि आपत्कालीन मदतीची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या रुग्णांना विशेषतः गरोदर मातांना योग्यवेळी उपचार मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मुसळधार पाऊस, खंडित होणारे रस्ते, ओढे-नाले आणि दुर्गम वाड्या-पाड्यांमुळे अनेकदा वेळेत रुग्णवाहिका पोहोचणे कठीण होते. काही ठिकाणी तर प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या महिलांना झोळीतून, खाटेवरून किंवा मानवी साखळी करून रस्त्यापर्यंत आणण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने यंदाच्या पावसाळ्यासाठी विशेष पूर्वतयारी केली असून जोखीमग्रस्त गावपाड्यांमध्ये राहणाऱ्या १२६ गरोदर मातांचे सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. प्रत्येक गरोदर मातेसाठी स्वतंत्र आरोग्य आराखडा तयार करण्यात आला असून प्रसूतीपूर्व संदर्भ सेवा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य केंद्रांची माहिती आणि आपत्कालीन मदतीची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक गरोदर मातेसाठी उपलब्ध असलेल्या वाहनाची माहिती, वाहन चालक किंवा मालकाचे नाव आणि संपर्क क्रमांक यांची स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणते वाहन उपलब्ध होईल, याची माहिती आधीच संबंधित कुटुंबांना देण्यात आली आहे. तसेच प्रसूतीचा संभाव्य कालावधी जवळ येण्यापूर्वी किमान एक महिना आधी मातांनी प्रसूती केंद्राजवळील नातेवाईकांकडे किंवा माहेरी स्थलांतरित व्हावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा वाहतुकीतील अडथळ्यांमुळे उपचारात विलंब होण्याचा धोका कमी होणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक गरोदर मातेला संबंधित आशा स्वयंसेविकेचा संपर्क क्रमांक देण्यात आला असून त्या नियमितपणे आरोग्य तपासणी, पाठपुरावा आणि मार्गदर्शन करत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांनाही विशेष सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचा वापर करण्याच्या सूचना सर्व गरोदर मातांना देण्यात आल्या आहेत. काही कारणास्तव या सेवा उपलब्ध होण्यात अडचण आल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी रुग्णवाहिका आणि स्थानिक वाहतूक साधनांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे नियोजन तालुका आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या काळात दुर्गम भागांतील गरोदर मातांची सुरक्षितता हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

जोखीमग्रस्त गावपाड्यांमधील एकाही गरोदर मातेला प्रसूतीसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आरोग्य विभागाने अत्यंत बारकाईने नियोजन केले आहे. सर्व तालुका आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वाहतूक व्यवस्था, संदर्भ सेवा आणि वैद्यकीय सुविधा यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ४६ दुर्गम आणि जोखीमग्रस्त गावपाड्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या १२६ गरोदर मातांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये अंबरनाथ तालुक्यात ५, भिवंडीमध्ये २६, कल्याणमध्ये ३३, मुरबाडमध्ये २० आणि शहापूरमध्ये सर्वाधिक ४२ गरोदर मातांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक गरोदर महिलेची अपेक्षित प्रसूती दिनांकानुसार स्वतंत्र माहिती संकलित केली आहे. संबंधित महिलांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून प्रसूती कोणत्या आरोग्य संस्थेत करावयाची आहे, याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रसूतीसाठी निवडलेल्या रुग्णालयाची माहिती, संपर्क क्रमांक, तेथील उपलब्ध सुविधा आणि संदर्भ सेवांची संपूर्ण माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे.