ठाणे : ठाणे-मुलुंडदरम्यानच्या प्रस्तावित नव्या रेल्वे स्थानकासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असला तरी तो अद्याप रेल्वे बोर्डाकडे वर्ग झालेला नसल्याची बाब पुढे आली आहे. या निधीच्या वर्गीकरणासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी निधी तातडीने वर्ग करण्यासह रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करणे, कोकण रेल्वेवर नवीन गाड्या सुरू करणे आणि गणेशोत्सवासाठी जादा रेल्वे सेवा देण्याच्या मागण्या म्हस्केंनी केल्या.

खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळ हे काम संथ गतीने सुरु होते. या कामासाठी २५० कोटींचा निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. मात्र हा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ निधी वर्ग करण्याची विनंती केली. अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवत निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी मान्य केली.

पूर्वी धावणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही कोकणातील कष्टकरी, रोजचे प्रवासी, छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मुंबईशी जोडणारी महत्त्वाची ‘जीवनरेखा’ होती. मात्र, करोना महामारीनंतर ही गाडी दादरऐवजी दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, दिवा स्थानकावरून पुढील प्रवासासाठी त्यांना गर्दीच्या लोकलवर अवलंबून राहावे लागते.

याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्वीप्रमाणे पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच, ही गाडी पूर्ववत करणे शक्य नसल्यास दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत करावा. अन्यथा, मुंबई-रत्नागिरीदरम्यान नवीन दैनिक रेल्वे सुरू करून तिला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर यांसारख्या प्रमुख स्थानकांवर थांबा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई, संपूर्ण कोकण आणि गोवा यांना जोडणारी लोकप्रिय प्रीमियम रेल्वे सेवा आहे. जून २०२३ पासून सुरू झालेल्या या रेल्वेला पर्यटक, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि कोकणवासीयांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वर्षभर या गाडीला मोठी मागणी असतानाही सध्या ती मर्यादित डब्यांसह धावत आहे.

पावसाळी वेळापत्रकामुळे या गाडीच्या फेऱ्यांची वारंवारताही कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीही वाढत आहे. पावसाळ्यात कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करावी आणि संपूर्ण पावसाळ्यात आठवड्यातून सहा दिवस ही गाडी सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जास्तीत जास्त विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.