ठाणे – मुंब्रा आणि दिव्यातील पाणीटंचाई आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. बुधवारी २९ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून, संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंब्रा आणि दिवा विभागातील पाणीटंचाई आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोडण्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. कल्याण फाटा ते वाय जंक्शन तसेच मुंब्रा अग्निशमन दलपर्यंतच्या मुख्य जलवाहिन्यांवरील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने ही मोहीम राबविण्यात येत असून ११ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू झाली आहे. या विशेष मोहिमेत बुधवार,१६ सप्टेंबर रोजी एकूण २९ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
या कारवाईत दिवा विभागातील भोलेनाथ नगर नाला येथील १३, गुलिस्तान हॉटेल नाला येथील ६ आणि शिळगाव मंदिर परिसरातील १, तर मुंब्रा विभागातील मित्तल ग्राउंड नाला येथील ७ आणि ग्लोबल नाला येथील २ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान कल्याण फाटा ते वाय जंक्शनपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिकेचे अधिकारी, अभियंते यांच्या उपस्थितीत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तमध्ये करण्यात येत आहे.
या मोहिमेत उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंते शशिकांत साळुंके, अतुल कुलकर्णी, उपअभियंते सुरेश वाघेरे, गुणवंत पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंते आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. यापूर्वीही ८ सप्टेंबर रोजी १६ आणि ११ सप्टेंबर रोजी १५ अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, ही कारवाई ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
अनधिकृत जोडण्या रोखण्यासाठी उपाययोजना
एकदा खंडित केलेल्या अनधिकृत नळजोडण्या पुन्हा जोडल्या जाऊ नयेत यासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वारंवार अनधिकृत जोडण्या होत असलेल्या ठिकाणी २४ तास क्लॉकमन तैनात करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्लंबर कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत नियमित गस्त घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंब्रा व दिवा परिसरातील नागरिकांना सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, तसेच जलवाहिन्यांमधील अनधिकृत पाणीउपसा रोखला जावा, यासाठी ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
