ठाणे : अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या इरफान अलीम सय्यद (वय ४४) याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे. इरफान याच्याविरोधात अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचे चार गुन्हे दाखल असून यातील एक गुन्हा गुजरात राज्यातील आहे. कळवा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी प्रकरणी इरफान सय्यद याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. याप्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू होता. त्याच्याविरोधातील या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ते न्यायप्रविष्ट आहेत. इरफान हा गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले होते. त्यामुळे इरफानविरोधात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अमली औषधी द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ विधीनिषिध्द व्यापार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे अन्वेषण शाखेने इरफान विरोधात स्थानबद्ध आदेश जाहीर होण्यासाठी डुंबरे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.

या प्रस्तावानंतर पोलीस आयुक्तांनी इरफान याच्या स्थानबद्धतेच्या आदेशाची अमंलबजावणी २८ ऑक्टोबरला करुन त्याला एका वर्षासाठी नाशिक येथील जिल्हा कारागृह येथे करुन स्थानबद्ध करण्यात आले आहे.

इरफान कोण?

इरफान हा मुंब्रा येथील अमृतनगर भागातील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात २०२६ मध्ये कळवा, २०२४ मध्ये शिळ डायघर, २०२२ मध्ये मुंब्रा पोलीस ठाण्यात तसेच, २०२१ मध्ये गुजरात येथील दानिलीमदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाले होते. गुन्ह्यात जामीनावर बाहेर सुटल्यानंतर तो पुन्हा अमली पदार्थ तस्करी करीत होता.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, सपना ताटे, सोमनाथ कर्णवर-पाटील, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक मोहन परब, पोलीस हवालदार अमोल देसाई, प्रशांत निकुंभ, अमित सपकाळ, संदीप चव्हाण, हरीष तावडे, अमोल पवार, नंदकिशोर सोनगिरे, हुसेन तडवी, अजय सपकाळ, अभिजीत मोरे, गिरीष पटील, पोलीस शिपाई आबाजी चव्हाण, अनुप राक्षे, कोमल लादे, छाया परबळकर यांनी केली.