ठाणे – रस्ते ओलांडताना नागरिकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्गावरील मुंब्रा वाय जंक्श्न ते कल्याण फाटादरम्यान तीन नवे पादचारी पुल उभारणीचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पुलांच्या कामासाठी अपेक्षित असलेला २७ कोटी ७२ लाखांचा निधी शासनाकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

१३ लाख ८६ हजार रुपये खर्चून या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असून हा प्रस्ताव प्रशासनाने पालिकेच्या येत्या १८ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.मुंब्रा शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा जातो. या मार्गावरील मुंब्रा वाय जंक्श्न ते कल्याण फाटाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत.

या भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. हा मार्ग ओलांडून नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांना प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे, या मार्गावरून तळोजा, पनवेल तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनर आणि मालवाहू ट्रकची सतत वाहतूक सुरू असते. महामार्ग रुंद असल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.

रस्ता ओलांडताना यापुर्वी अपघातही झालेले आहेत. असे अपघात रोखण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पादचारी पूल उभारण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी, वाहतूक पोलीस, मुंब्रा वाहतूक उपविभाग आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी परिसराची संयुक्त पाहणी केली होती.

यानंतर वाय जंक्शन ते कल्याणफाटा दरम्यान तीन पादचारी पुल उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून या निर्णयानुसार, शिबलीनगर, दोस्ती कंपाऊंड आणि अग्निशमन दल कार्यालयासमोर हे पूल उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी सविस्तर सर्वेक्षण करून तपशीलवार अंदाजपत्रक व प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

शासन निधीवर मदार

मुंब्रा वाय जंक्शन ते कल्याणफाटा दरम्यान तीन ठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार प्रत्येक पूल सुमारे ६० मीटर लांबीचा आणि ४ मीटर रुंद असणार आहे. दोन्ही बाजूंना जिना आणि रॅम्पची सुविधा देण्यात येणार आहे. या तिन्ही पादचारी पुलांसाठी अंदाजे २७ कोटी ७२ लाख रुपयांचा ढोबळ खर्च अपेक्षित आहे. मात्र पालिकेवरील आर्थिक दायित्व लक्षात घेता या प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.