ठाणे – ठाणे, मुंब्रा शहरात आग दुर्घटनांचे सत्र सुरूच आहे. शहरात तीन दिवसात पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहे. यात सदनिका, वाहन, गोदाम यांचा समावेश आहे. या आगीवर ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळवले आहे.
पहिली घटना कासारवडवली येथील कावेसर परिसरात डॉग शेल्टरमधील एसीच्या आऊटडोअर युनिटला मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागली होती. त्यानंतर दुसरी आगीची घटना मुंब्रा येथे घडली. यामध्ये मेघ कंपनी कंपाऊंड मधील पुठ्ठ्याच्या गोदामाला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागली होती. या घटनेत सहा गाळे जळाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांकडून रात्री ११ वाजताच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली.
तर, तिसरी घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिवाई नगर येथील विनायक अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेला आग लागली होती. या घटनेत देव्हारा, कपाट आणि इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले. चौथी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजता कॅसलमिल नाका येथील शंकर मंदिराजवळील एका बंद घरामध्ये आग लागली होती. या घटनेत देखील घरगुती साहित्य जळून खाक झाले.
पाचवी आगीची घटना गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास समता नगर येथे घडली. यात रस्त्यात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला आग लागली होती. या सर्व घटनांवर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, शहरातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
