ठाणे : ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पदाधिकारी अश्रफ शानू पठाण यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अश्रफ शानू पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी घेतल्याचा आरोप आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी नाजिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाणे महापालिका निवडणूकीनंतर भाजप आणि शिंदे गटाने ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन केली. सध्या महापालिकेत शिंदे गटाकडे महापौर आणि उप महापौरपद भाजपकडे आहे. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पदी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) मुंब्रा येथील नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांच्याकडे आहे. नुकतीच त्यांची या पदावर निवड झाली. अश्रफ शानू पठाण हे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून ते मुंब्रा शहरातील एका प्रभागातून निवडून येतात. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर मुंब्रा शहराची जबाबदारी देखील दिली आहे.

प्रकरण काय ?

भाजपच्या कौसा मंडळ अध्यक्ष नाजिया तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २७ जानेवारीला मुंब्रा येथील अमृतनगर भागात अश्रफ शानू पठाण यांनी ते नगरसेवक म्हणून विजयी झाले असताना ‘जश्न-ए-जीत’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेत एकेरी उल्लेख केला. हे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले. अश्रफ शानू पठाण यांनी धार्मिक भावना दुखावल्या असून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तांबोळी यांनी तक्रारीत केला आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा

– नाजिया यांच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात महापालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्याविरोधात १ मार्चला भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम २९९, ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.