ठाणे : दिवा येथील एक सात वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. आई-वडिलांसह संपूर्ण दिवा शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली होती. परंतु या सात वर्षांची मुलगी एका व्यक्तीला सापडली. सुमारे तीन दिवस त्या व्यक्तीने तिचा मुलीप्रमाणे घरी सांभाळ केला. कारण, त्या व्यक्तीच्या मुलीसोबत अत्याचार झाले होते. या मुलीसोबतही असे गैरकृत्य होऊ नये म्हणून त्याने तिचे संगोपन केले.

दुसरीकडे मुलीचे पालक चिंतेत होते. पोलिसांनी ९४८ सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून अखेर मुलीचा शोध घेतला. मुलीला तिच्या वडिलांकडे सूपूर्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा छडा लागल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. सुमारे ६० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, दिवा शहरातील नागरिक तिचा शोध घेत होते.

दिवा येथील साक्षी पांडे (७) ही मुलगी तिचे वडील, जुळी बहिण, आई आणि दोन भावंडांसह वास्तव्यास आहे. वडिल भिवंडीतील रांगोळीच्या एका कारखान्यात काम करतात. सुमारे पाच महिन्यांपूर्वीच ते उत्तर प्रदेश येथून दिवा येथे राहण्यास आले होते. २८ मे या दिवशी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ती खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली आणि परतली नाही. तिच्या आई-वडिलांनी आणि परिसरातील रहिवाशांनी तिचा शोध सुरु केला. परंतु तिचा शोध लागला नाही. अखेर तिच्या वडिलांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला.

गुन्ह्याची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे मुलीच्या घरी गेले. त्यांनी मुलीची माहिती घेतल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी सहा पथके तयार केली. दिवा शहरात अनेक इमारतींना जिने नाहीत. त्यामुळे पाच ते सहा मजले चढून पोलिसांनी या भागातील इमारती, गच्ची तपासल्या, परिसरातील गटर चेंबरमध्ये पाहणी केली. परंतु मुलीचा शोध लागला नाही.

दरम्यान, एका इमारतीच्या सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये मुलगी दिवा आगासन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जाताना दिसली. त्यानंतर ती दिवा स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील २८ मे यादिवशी रात्री १०.५७ वाजताच्या अंबरनाथ लोकलगाडीमध्ये प्रवेश करताना सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसली. पोलिसांच्या पथकाने कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकात त्यांची पथके पाचारण केली. त्यानंतर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री १२ वाजताच्या सुमारास मुलगी एका व्यक्तीसोबत अंबरनाथ स्थानकात उतरताना दिसली. त्यानंतर दोघेही बदलापूर लोकलमध्ये चढले आणि मध्यरात्री बदलापूर स्थानकात उतरताना दिसले.

मुलगी बदलापूरमध्ये असल्याचे समजताच, पोलिसांच्या पथकांनी बदलापूरमध्ये जाऊन मुलीचा शोध सुरु केला. ३१ मे या दिवशी मध्यरात्री बदलापूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण, रिक्षाचालक, स्थानिक नागरिक, स्थानिक पोलिसांना व्यक्तीचे आणि मुलीचे छायाचित्र दाखविले. त्यावेळी त्या व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली. पथकाने त्या व्यक्तीचे घर गाठले. त्यावेळी त्याच्याकडे बेपत्ता मुलीसह तीन ते नऊ वयोगटातील चार अल्पवयीन मुले आढळली. त्याची चौकशी केली असता, इतर तीन मुले त्याची असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने मुलीचा सांभाळ केला असून मुलगी कोणत्याही गैरकृत्याला बळी पडू नये म्हणून त्याने तिला घरी आणल्याचे स्पष्ट केले.

संबंधित व्यक्ती नवी मुंबई येथील एका कंपनीत मानव संसाधन विभागात काम करतो. मागील दीड वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. तेव्हापासून तो मुलांचे संगोपन करतो. त्याच्या एका मुलीवर अत्याचार झाले होते. याप्रकरणी कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता. आपल्या मुलीप्रमाणे या बेपत्ता मुलीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून त्याने तिला घरी आणले आणि तिचे संगोपन केले. तिला ते पोलीस ठाण्यात आणणार होते. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

या तपासात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे, उपायुक्त बाळासाहेब पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक शरद कुंभार, नितीन पगार, साहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत खतेले, अमोल कोळेकर, विनायक माने, रोहीत केदार, गणेश जाधव, तेजस सावंत, पोलीस उपनिरीक्षक अनु शर्मा यांच्यास ४५ अमलदार यांनी दोन दिवसांत हे प्रकरण उघडकीस आणले.

त्या व्यक्तीने मुलीचे संगोपन अत्यंत चांगले केले होते. प्राथमिक तपासात तो व्यक्ती नम्र स्वभावाचा आणि चांगल्या आचरणाचा दिसला. साक्षी देखील त्या व्यक्तीला वडिलांप्रमाणे हाक मारु लागली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंब्रा पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली. – बाळासाहेब पाटील, उपायुक्त, परिमंडळ एक.