ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात नऊ जण जखमी झाले होते. सोमवारी रात्री आणखी एका जखमी रुग्णाला उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या घटनेत आता जखमींचा आकडा १० इतका झाला आहे. तर, मृत्यूमुखी पडलेल्या चार पीडितांचे मृतदेह शवागारातून बाहेर काढून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनाकडे अपघातांवर उपाययोजना करण्याची मागणी केली.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी रेल्वेगाडीतून पडून चार जणांचा मृत्यू तर नऊजण जखमी झाले होते. सोमवारी रात्री जितेंद्र म्हात्रे (३२) हा देखील उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाला. त्यामुळे आता जखमींचा आकडा आता १० इतका झाला आहे.
तर मच्छिंद्र गोतारणे यांच्या डोक्याला मार लागला असल्याने त्यांना मंगळवारी त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील तीन रुग्णांवर मंगळवारी हाडाच्या शस्त्रक्रिया करण्यात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सध्या आठ रुग्ण दाखल आहेत. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोमवारी दुपारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तर दुसऱ्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत अशी माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.