ठाणे : करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांत महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून ही परिस्थिती बदलण्यासाठी पालिका प्रशासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याबरोबरच येत्या डिसेंबर महिनाअखेपर्यंत १०० टक्के कर वसुली करण्याचे निर्देश दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवसुलीचा आढावा घेतला. आतापर्यंत ३५५ कोटी ४६ लाख रुपये मालमत्ता कराची वसुली झाली आहे. अर्थसंकल्पात ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी ४८ टक्के मालमत्ता कराची वसुली झाली आहे. जवळपास ५ कोटी ४७ लाख मालमत्ता कराची देयके वितरित करण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या एकूण १७६ विभागांतील सर्वच नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी प्रभाग समिती निहाय विशेष वसुली मोहीम राबविण्याच्या सूचना हेरवाडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे विभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडून वसुली करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना देत पहिल्या सहामाहीमधील थकबाकीदारांकडील वसुली करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.