कळवा परिसरात सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांकडे केली असतानाच, महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यांमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत. या आदेशानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेकायदा बांधकामांविरोधात बुधवारपासून कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात क्लस्टरचा अडसर; आमदार संजय केळकर यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र

कळवा परिसरात सुरु असलेल्या बेकायदा बांधकामप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टि्वट केले आहे. त्यात त्यांनी अनधिकृत बांधकाम ज्या गतीने कळव्यात चालू आहे, ते बघितल्यानंतर प्रशासन आहे कुठे हा प्रश्न पडतो. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सगळ्यांशी बोललो पण, चालूच…ब्रह्मा, विष्णू, महेश…आयुक्त लक्ष द्या नाहीतर मला प्रत्येक बिल्डींगला पत्रकारांना घेऊन भेट द्यावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यामुळे आमदार आव्हाड यांनी हतबलता व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर बेकायदा बांधकामांप्रकरणी सर्वांशी बोलल्यानंतरही ती सुरुच असल्याचे सांगत त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश असा उल्लेखही त्यांनी केला आहे. त्यामुळे हे तिघे कोण अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील बालभवन मध्ये कला प्रदर्शनाचे आयोजन

बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरून आमदार आव्हाड यांनी केलेल्या टिकेनंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले आहेत. या आदेशानंतर या विभागाने बुधवारपासून प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्तांसोबत बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली आहे. ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जी. जी गोदेपुरे व अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या उपस्थितीत कळवा आणि दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कळवा दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालविला. प्रभागसमितीतील अनधिकृत बांधकामावर कारवाईसोबत एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही महेश आहेर यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal commissioner orders encroachment department to file mrtp cases against illegal constructor dpj
First published on: 07-12-2022 at 17:24 IST