ठाणे : मागील एक ते दोन महिन्यापासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. मालमत्ता कर थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत कर भरण्यास नकार देणाऱ्या निवासी मालमत्ताधारकांच्या नळजोडण्या खंडित करणे आणि अनिवासी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याचे आदेश राव यांनी बैठकीत दिले.
मालमत्ता कर हा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. या विभागात अर्थसंकल्पात कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात येते. यंदाच्या आर्थिक वर्षातही असेच उद्दीष्ट देण्यात आले होते. यापैकी किती कराची वसुली झाली, याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांच्यावर तात्काळ जप्ती, वॉरंट बजावणे, नळ जोडणी खंडीत करुन, पाणीपुरवठा बंद करणे नळजोडणी आणि इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
अनिवासी मालमत्ता जप्ती मोहिम
अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून १० फेब्रुवारीपर्यंत ही मोहिम सुरू राहणार आहे. या मोहिमेत अनिवासी मालमत्ताधारकांवर जप्ती आणि सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत. तसेच, कर वसुली वाढविण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
पालिकेचे नागरिकांना आवाहन
आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पध्दतीने भरण्याकरिता महापालिकेच्या http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच फेब्रुवारी आणि मार्च २०२६ या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी (३ मार्च, रोजी धुलीवंदन असल्याने हा दिवस वगळून) सकाळी १०.३० ते ४.३० तसेच सर्व रविवार सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत कर संकलनाकरिता करवसुली संकलन केंद्र व मुख्य कार्यालयही कार्यान्वीत ठेवण्यात येणार आहेत. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

