ठाणे : अभ्यासाच्या वयातच अर्थशास्त्र, वित्तीय बाजारपेठ आणि शेअर बाजाराचा सखोल अभ्यास करून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे सुपुत्र आंजनेय राव यांनी लेखन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंजनेय यांनी शेअर बाजारातील नव्या गुंतवणूकदारांसाठी ”फ्रॉम माईंड टू मार्केट : बिगिनर्स गाईड टू स्टॉक मार्केट फाउंडेशन” हे पुस्तक प्रकाशित केले असून, कमी वयात आर्थिक साक्षरतेचा घेतलेला हा ध्यास चर्चेचा विषय ठरला आहे.
हे पुस्तक विशेषतः शेअर बाजारात नव्याने प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुण आणि गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचे आहे. पुस्तकामध्ये मूलभूत विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण, गुंतवणुकीच्या विविध रणनीती, चार्ट पॅटर्न, जोखीम व्यवस्थापन, बाजारातील तरलता आणि मालमत्ता वाटप अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विचार करा, गुंतवणूक करा आणि प्रगती साधा, हा पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.
आंजनेय राव हे आयबी डिप्लोमा अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असून त्यांना अर्थशास्त्र, वित्त आणि जागतिक राजकारण या विषयांची विशेष आवड आहे. पुस्तकाच्या परिचयानुसार ते मागील तीन वर्षांपासून शेअर बाजारातील गुंतवणूक आणि वित्तीय बाजारपेठांचा अभ्यास करीत आहेत. गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना नव्या गुंतवणूकदारांना सहज समजाव्यात आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अमेझॉनवरील नोंदीनुसार हे पुस्तक ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रकाशित झाले असून देशभरातील वाचकांसाठी उपलब्ध आहे.
लोकसेवक म्हणून आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत कर्तव्यनिष्ठा, शिस्त, जबाबदारी आणि नागरिकांप्रती संवेदनशीलता या मूल्यांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २००३ च्या महाराष्ट्र केडरमधील भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले सौरभ राव मार्च २०२४ पासून ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यातून आणि कुटुंबाकडून मिळालेल्या संस्कारांचे प्रतिबिंब आंजनेय यांच्या या बौद्धिक कामगिरीमध्ये दिसून येते.
आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणाला आणि प्रोत्साहनाला आंजनेय यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखनातून सार्थ ठरवले आहे. मुलाने कमी वयात स्वतंत्र विचार, अभ्यास आणि अनुभवाच्या आधारावर पुस्तक प्रकाशित करणे ही राव कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण तरुण पिढीसाठी गौरवाची आणि प्रेरणेची बाब आहे. आजच्या तरुणांनी केवळ नोकरी किंवा पारंपरिक शिक्षणापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता आपल्या आवडीच्या क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभव समाजासमोर मांडावा, हा संदेश आंजनेय यांच्या कामगिरीतून मिळतो. कमी वयातही सातत्यपूर्ण अभ्यास, जिज्ञासा आणि आत्मविश्वासाच्या बळावर समाजात स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
शेअर बाजार समजून घेण्याची इच्छा असलेल्या तरुणांनी आणि नव्या गुंतवणूकदारांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. मात्र, शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असल्याने पुस्तकातून मिळालेल्या ज्ञानासोबत स्वतःचा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आर्थिक निर्णय घेणे आवश्यक आहे.
अर्थशास्त्र, वित्त आणि जागतिक राजकारणाची तीव्र आवड असलेला एक विद्यार्थी. गेल्या तीन वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यामुळे, त्याला आर्थिक बाजारपेठा समजून घेण्यात आणि नवशिक्यांसाठी गुंतवणूक अधिक सुलभ करण्यात खूप रस आहे. अर्थशास्त्र, गणित आणि जागतिक राजकारण या विषयांवर लक्ष केंद्रित करून, आंजनेयाला विद्यापीठात अर्थशास्त्र शिकण्याची आकांक्षा आहे. अभ्यासू वृत्ती आणि सतत शिकण्याच्या प्रेरणेने, गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना सोप्या करून नवीन गुंतवणूकदारांना आत्मविश्वास वाढविण्यात मदत करण्याचे त्याचे ध्येय आहे.
