Thane Municipal Corporation EV Project : गेली अनेक वर्षे कागदावर असलेला विद्युत वाहनांकरीता शहरात ई-चार्जिग स्थानके उभारणीचा प्रस्ताव आता लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. चार्जिंग स्थानकांसाठी पालिका प्रशासनाने १९ जागा अंतिम करत या प्रकल्पासाठी निविदा काढली आहे. खासगी लोकसहभाग (पीपीपी) तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून या उलट पालिकेला प्रतियुनीट मागे १ रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे.

देशभरातील सर्वच शहरांमध्ये पर्यावरणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून विद्युत वाहनांचा पर्याय शासनाने पुढे आणत त्याच्या खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे. असे असले तरी, शहरांमध्ये मात्र चार्जिंगची सुविधा नसल्याने नागरिक अशी वाहने घेण्याकडे वळत नसल्याचे चित्र आहे. यातूनच ठाणे महापालिकेने पर्यावरणपुरक विद्युत वाहनांकरिता शहरात चार्जिंग स्थानके उभारणीचा निर्णय घेतला होता. मात्र,त्यासाठी जागा अंतिम होत नसल्यामुळे हा प्रकल्प गेले अनेक वर्षे कागदावरच होता.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभाग आणि शहर विकास विभागाने चार्जिग स्थानकांसाठी आवश्यक असलेल्या जागांचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारणे व्यवहार्यता तपासण्यात आली. यानंतर शहरातील १९ जागा निश्चित करण्यात आल्या. या कामासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. खासगी लोकसहभाग (पीपीपी) तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी पालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून या उलट पालिकेला प्रतियुनीट मागे १ रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार आहे.

ई-चार्जिंग स्थानकांच्या उभारणीसाठी खासगी संस्थेची महापालिके सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्यासोबत ६ मे २०२५ रोजी सामंजस्य करार केला होता. २०२२ च्या सर्व साधारण सभेतील ठरावानुसार निश्चित करण्यात आलेल्या ३० ठिकाणांची पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार १९ ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य असल्याचे संस्थेने स्पष्ट केले होते. हा प्रकल्प उभारणीसाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून संपूर्ण खर्च निविदा प्रक्रियेत निवडल्या जाणाऱ्या ठेकेदाराकडून केला जाणार आहे. महापालिकेला प्रति युनिट किमान १ रुपया दराने जास्तीत जास्त महसूल देणारी निविदा स्वीकारली जाणार आहे.

निवड झालेल्या ठेकेदाराला महापालिकेकडून ४ ते ५ मीटर रुंद आणि २० ते ३० मीटर लांबीची जागा १० वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उभारणी, संचालन, देखभाल, वीजजोडणी, परवानग्या तसेच सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची राहणार असून पहिल्या ३ वर्षांत ठेकेदाराला हा प्रकल्प बंद करता येणार नाही. चार्जिंगसाठी आकारले जाणारे दर केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केले जाणार असून कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक जाहिरातीस परवानगी नसणार आहे.

चार्जिंग स्थानके कुठे

मनोरुग्णालय चौक, कशिश पार्क सेवा रस्ता, वृंदावन बस स्टॉप, कचराळी तलाव, आकाशगंगा राबोडी, वागळे इस्टेट रस्ता क्रमांक २२, पासपोर्ट ऑफिसजवळ, लोकमान्य सावरकर नगर येथील बस आगार जंक्शन, पोखरण रस्ता क्रमांक १, देवदया नगर, पोखरण रस्ता क्रमांक २, गांधी नगर जंक्शन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ, आनंद नगर बस थांबा, सुविधा भूखंड पातलीपाडा, यूआरसीटी जंक्शन, धर्माचापाडा, सेवा रस्ता खारेगाव ९० फूट रोड, खारेगाव टोलनाका, आत्मराम चौक, मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आयुष्यमान आरोग्य केंद्र