ठाणे : दिवा येथील अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे बेघर झालेल्या नागरिकांनी ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. त्यांनी संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करून पुनर्वसनाची मागणी केली.दिवाळीनंतर ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी दिव्यात कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता.
मंगळवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांनी येथील इमारती रिकाम्या केल्या. आता या सर्व इमारती तोडण्याची कारवाई पालिकेच्या वतीने सुरु आहे. या सातही इमारतींमध्ये २७५ कुटुंबे वास्तव्यास होती.या कारवाईनंतर बेघर झालेल्या शेकडो रहिवाशांनी शुक्रवारी पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला आणि मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करण्यासोबतच आमचे पुनर्वसन करा किंवा आम्हाला बाजारभावाप्रमाणे आर्थिक नुकसान भरपाई द्या अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली.
यावेळी रहिवाशांनी महापालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांची भेट घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने महापालिकेकडून या रहिवाशांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. या प्रकरणात विकासकावर गुन्हा दाखल करण्याची तयारी आता रहिवाशांनी सुरु केल्याचे समजते.
