ठाणे स्थानक परिसरातील रहदारीच्या रस्ता फेरीवाल्यांपासून मुक्त करण्याचा पालिकेचा निर्धार पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कारवाईची मोहीम सुरु होती. गेल्या चार दिवसांपासुन सुरु असलेली ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई रविवारी देखील सुरूच होती. सुट्टीच्या दिवशी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी देखील कारवाईत सहभाग घेतला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरापासून ते गोखले रास्ता तसेच जांभळी नाका पर्यंत जावून त्यांनी  पाहाणी केली.  यावेळी आयुक्तांनी फेरफटका मारून रस्त्यात अवैधरित्या लावण्यात आलेल्या खासगी वाहने तसेच परवानाधारक रिक्षाचालकांना पार्किंगचा उपयोग करा, असे आवाहनही  केले.

गेल्या ४ दिवसांपासून आक्रमक असणारे आयुक्तांनी आज मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. ठाणे पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना गावदेवी मार्केट परिसरात झालेल्या मारहाणीनंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे आक्रमक झाले होते. त्यांनी गेल्या ४ दिवसात ठाणे रेल्वे स्थानक परिसर, गावदेवी, घोडबंदर रोड, वसंत विहार तसेच शिवाई नगर आणि शास्त्री नगर येथे देखील पालिकेच्यावतीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शनिवारी रात्री उशिरा आयुक्त संजीव जयस्वाल कारवाई करत असताना फेरीवाल्यांना विनंती केली होती. त्यानंतर रविवारी पालिका आयुक्तांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारवाईला सुरवात केली. त्यांनी गोखले रोड तसेच स्टेशन रोड या परिसरात ठाणेकरांनी वाहने रस्त्यावर लावू नयेत, असे आवाहन केले.  यावेळी त्यांनी काही रिक्षा चालकांचे परवाने देखील घेतल्याचं निदर्शनास आले. आजच्या कारवाईनंतर सोमवारी देखील कारवाई सुरु राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र, कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.