scorecardresearch

शिवसेना आणि ठाणे समीकरण कायम?

शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९७०च्या आसपास शिवसेनेला ठाण्यात सत्ता मिळाली.

Thane Municipal Corporation
ठाणे महानगरपालिका

स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथम सत्ता मिळाली ती ठाण्यात. तेव्हापासून ठाणे आणि शिवसेनेचे अतूट नाते निर्माण झाले. जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त काळ शिवसेनेचा भगवा ठाण्यावर फडकत आहे. या निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न होत असला, तरी शिवसेना आणि ठाणे हे समीकरण कायम राहील, अशी चिन्हे आहेत.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९७०च्या आसपास शिवसेनेला ठाण्यात सत्ता मिळाली. पुढे १९७४ मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सतीश प्रधान निवडून आले होते. प्रधान यांच्या काळात ठाण्याचा मोठय़ा प्रमाणावर कायापालट झाला. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यावर झालेल्या पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकला आणि सतीश प्रधान प्रथम महापौर झाले. मधल्या काळात काँग्रेसने डोके वर काढले, पण यश कायम राहिले नाही. १९९७ पासून गेली २० वर्षे ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता असून, सातत्याने शिवसेनेचे महापौर निवडून आले आहेत.

भ्रष्टाचार आणि टक्केवारीवरून ठाणे महानगरपालिका गाजली होती. नंदलाल समितीने केलेल्या चौकशीत सर्वपक्षीय नगरसेवक दोषी आढळले होते. शिवसेना आणि ठाणे हे नाते अतूट असले तरी शहर सुधारणेची कामे मुख्यत्वे सनदी अधिकाऱ्यांकडून झाली. टी. चंद्रशेखर यांच्या काळात ठाण्याने कात टाकली. ठाण्यातील रस्ते रुंद झाले. टपऱ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरातील टपऱ्या हटविण्यात आल्या. ठाण्यातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी रस्तारुंदीकरणाच्या मोहिमेला विरोध केला, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे चंद्रशेखर यांच्या मागे ठामपणे उभे राहिल्याने ठाणे बदलले. विद्यमान आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कारकीर्दीत ठाणे पुन्हा एकदा सुधारले. स्टेशन परिसरापासून शहरातील सारेच मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम जयस्वाल यांनी केले. नेहमीप्रमाणे नगरसेवक आणि नेतेमंडळींनी विरोधी सूर लावला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पााठिंब्यामुळे जयस्वाल यांना हे शक्य झाले.

शिवसेनेचाच वरचष्मा

ठाण्यात अजूनही शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. शिवसेनेच्या या गडाला सुरुंग लावण्याकरिता भाजप प्रयत्नशील आहे. कळवा-मुंब्रा परिसरातील प्रभागांची संख्या वाढल्याने राष्ट्रवादीला यशाची अपेक्षा आहे. काँग्रेस आणि मनसेचे अस्तित्व फारसे काही जाणवत नाही. महापालिकेत एकूण १३१ जागा असल्याने शिवसेनेने स्वबळावर ७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवसेनेचे ठाण्यावर वर्चस्व राहिले असले तरी शिवसेनेला एकहाती सत्ता मिळालेली नाही. भाजप किंवा छोटय़ा पक्षांच्या मदतीने अनेक वर्षे सत्ता राबविली. यंदा स्वबळावर सत्ता पटकवायची हा निर्धार पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ७००चौरस फुटापर्यंत मालमत्तांना करातून सूट, नवीन उद्याने, सेंट्रल पार्क आदी मोठमोठाली आश्वासने शिवसेनेने दिली आहेत.

ठाण्यातील मध्यमवर्गीय, पांढरपेशा मतदार असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस अपेक्षित आहे. मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली तरच ठाण्यात युती होऊ शकते. मुंबईत सध्या तरी युतीचे चित्र धूसर असल्याने ठाण्यातही दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यातच शिवसेना आणि भाजपमध्ये परस्परांचे मोहरे गळाला लावण्याचे उद्योग जोरात सुरू आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगली लढत दिली होती. पण राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नगरसेवक शिवसेना वा भाजपमध्ये गेले आहेत. कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळेच राष्ट्रवादीची सारी मदार कळवा-मुंब्रा विभागांतील ३६ प्रभागांवर आहे.

भाजपमध्ये सुंदोपसुंदी

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत ठाणे शहर या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून भाजपचे संजय केळकर निवडून आले होते. यामुळेच भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शहरातील जास्तीत जास्त प्रभागांतून उमेदवार निवडून आणण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पण भाजपमध्येही सुंदोपसुंदी आहे. जुन्या भाजपच्या नेत्यांना बाजूला सारत राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांमधून आलेल्या नेत्यांची चलती सुरू झाली. भिंवडीचे खासदार कपिल पाटील (जुने राष्ट्रवादी) यांच्याकडे पक्षाने संघटनाची जबाबदारी सोपवली. यातूनच पाटील व अन्य काही नेत्यांनी संख्याबळ वाढविण्याच्या दृष्टीने वादग्रस्त पाश्र्वभूमी असलेल्यांना भाजपमध्ये पावन करून घेण्यावर भर दिला आहे. ठाणे शहरात भाजपमध्ये उमेदवारीवरून प्रचंड मारामाऱ्या आहेत.

राष्ट्रवादीची भिस्त कळवामुंब््रय़ावर

कळवा-मुंब्रा परिसरातील प्रभागांची संख्या वाढली आहे. यंदा ३६ सदस्य या विभागातून निवडून येणार आहेत. कळवा-मुंब्रा परिसरावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या सात वर्षांत वर्चस्व प्रस्थापित केले. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत गणेश नाईकांसह राष्ट्रवादीचे बडे नेते पराभूत झाले. पण आव्हाड यांना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. मतदारसंघातील संपर्क ही त्यांची जमेची बाजू. यामुळेच कळवा-मुंब्रा परिसरातून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राष्ट्रवादीची योजना आहे. काँग्रेसची अवस्था फारच कमकुवत झाली आहे. काँग्रेसचे अनेक स्थानिक नेते अन्य पक्षांमध्ये गेले. राष्ट्रवादीची वाढ होत असताना काँग्रेस पक्ष पार दुबळा झाला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी करण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला असला तरी घोळ शेवटपर्यंत कायर राहील अशीच चिन्हे आहेत. मनसेला ठाण्यात अजून बाळसे धरता आलेले नाही. यंदाही मनसेला फार काही यशाची अपेक्षा नाही.  युती झाल्यास १०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे युतीचे उद्दिष्ट असेल. स्वतंत्रपणे लढल्यास ५० ते ६० जागा जिंकण्याचा प्रयत्न शिवसेनेचा राहील. लढती कशाही झाल्या तरी ठाण्यात शिवसेना मोठा पक्ष असेल हे मात्र निश्चित.

ठाणे आणि शिवसेना हे एक समीकरण तयार झाले आहे. ठाणे शहरात झालेली विकास कामे लोकांसमोर आहेत. ठाण्याचा विकास शिवसेनाच करू शकते ही नागरिकांची खात्री झाली आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ठाण्यात शिवसेनेचीच सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

एकनाथ शिंदे, शिवसेना नेते, तथा सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम)

शिवसेनेने ठाण्यासाठी काहीच केले नाही. शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेली आश्वासने ही सारीच थापेबाजी आहे. ठाण्यातील जनता शिवसेनेच्या कारभाराला विटली आहे.

जितेंद्र आव्हाड, आमदार राष्ट्रवादी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2017 at 02:40 IST