ठाणे : ठाणे महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग अभियानात दहा दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आशा सेविकांना ठरवून देण्यात आले होते. परंतु आशासेविकांना ठरवून दिलेल्या उद्दीष्टांपेक्षा अधिक नोंदणी केली असून या कामगिरीमुळे आशा सेविकांचा पालिकेच्यावतीने सोमवारी सन्मान करण्यात आला.

ठाणे शहरात क्षयरोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात येते. २०२४ मध्ये शहरात ८ हजार ५०० हून अधिक क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी १४ जणांचा मृत्यूही झाला होता. तर, जानेवारी ते ऑक्टोंबर या दहा महिन्याच्या कालावधीत शहरात ७ हजार ५५६ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ५ जणांचा मृत्यु झाला होता. क्षयरोगाचे वेळीच निदान झाले तर, हा रुग्ण पुर्णपणे बरा होऊ शकतो. यामुळे लक्षणे जाणविल्यास तात्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन पालिकेकडून सातत्याने करण्यात येत असून त्याचबरोबर शहरातील नागरिकांची क्षयरोग तपासणी करण्यात येत आहे. संपुर्ण शहर क्षयरोग मुक्त व्हावे, या उद्देशातून पालिकेकडून क्षयरोग अभियान राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोग अभियानात दहा दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्दीष्ट आशा सेविकांना ठरवून देण्यात आले होते. परंतु आशा सेविकांनी हजारहून अधिक संशयित रुग्णांची नोंदणी केली. त्यामुळेच ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात

अपेक्षेपेक्षा अधिक कामगिरी करणाऱ्या प्रतिनिधीक स्वरुपात २० आशा सेविकांना महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांसह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

चौकट घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत, आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन देत आणि आजारांबाबत जनजागृती करत आशा सेविका आरोग्य यंत्रणेचा भक्कम आधारस्तंभ ठरत आहेत. संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांची नोंदणी करणे ही अत्यंत जबाबदारीची भूमिका त्यांनी प्रभावीपणे पार पाडली आहे. अनेक आशा सेविकांनी निर्धारित उद्दिष्टांपेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करून आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी म्हटले. तर, आशा सेविकाच्या कामाचे कौतुक करीत ठाणे महापालिका त्यांच्या पाठीशी असल्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सांगितले.

संशयित क्षयरुग्णाच्या नोंदणी कामात आशा सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच १० दिवसांत १५० जणांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले असताना हजारहून अधिक संशयित रुग्णांची नोंदणी त्यांनी केली, त्यामुळेच त्यांचा सन्मान करण्यात आला असल्याचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.