ठाणे – ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने राबविण्यात येणारी ‘बालरंगकर्मी’ योजना सध्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. ठाणे महापालिका आणि साहिल मोशन आर्ट यांच्या वतीने सुरू झालेल्या या उपक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी असून, नाट्य आणि सिनेक्षेत्रातील प्रशिक्षणातून त्यांच्या कलात्मक क्षमतांचा सर्वांगीण विकास घडवला जात आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची अभिनव योजना राबविणारी ठाणे महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे.
या बालरंगकर्मी योजनेत ठाणे महापालिकेच्या एकूण १०२ शाळांचा समावेश असून, इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. शाळांमधील वार्षिक स्नेहसंमेलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी साहिल मोशन आर्ट या संस्थेकडे पाठवली जाते. तसेच, इतर इच्छुक विद्यार्थ्यांनाही या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाते. विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन त्यांची या योजनेसाठी निवड केली जाते. गेली चार वर्षांपासून ही योजना राबविली जात असून सुरुवातीला केवळ २५० विद्यार्थ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत या उपक्रमाबाबत जागरूकता वाढल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. सध्या ४०० हून अधिक विद्यार्थी या योजनेच्या माध्यमातून सिने आणि नाट्य क्षेत्रातील विविध पैलू शिकत आहेत.
नऊ केंद्रांवर पार पडते प्रशिक्षण
ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील महापालिका शाळांचा यात समावेश असल्याने विद्यार्थ्यांना सोयीस्कर प्रशिक्षण मिळावे यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान एकूण नऊ प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये ४०० विद्यार्थ्यांचे नऊ गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर दोन प्रशिक्षक अशा एकूण १८ नाट्यक्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुभवी प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना दर शनिवारी सहा तासांचे सखोल नाट्यप्रशिक्षण दिले जाते. ही योजना दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या सहा महिन्यांच्या कालावधीत राबविली जाते. अभिनय, संवादकला, रंगमंचावरील वावर आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विविध कौशल्यांचा विकास या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये होत आहे.
अनुभवी कलाकारांसह विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी
यंदाच्या वर्षी पासून या योजनेत आणखी एक बदल करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्यक्षात पडद्यावर आणि व्यासपीठावर काम करण्याचा आत्मविश्वास निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन यंदा ‘युद्ध आमचे सुरु’ हे नाटक बसविण्यात आले. या नाटकाचे १५ प्रयोग ठाणे, कल्याण, वाशी अशा विविध शहरात झाले. तर, अनुभवी कलाकार आणि या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ‘एका बटरची बेटर गोष्ट’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे.
‘बालरंगकर्मी’ योजना ही केवळ कलागुणांना वाव देणारी नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहे. परंतू, ही योजना केवळ ठाणे महापालिका शाळांपुरती मर्यादित राहू नये तर, नाट्यचळवळीचा पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळे शासनाने राज्यस्तरावर ही योजना सुरु करण्याचा विचार केला पाहिजे.- मंगेश देसाई, साहिल मोशन आर्ट
