ठाणे – करोना काळामुळे यंदा जनगणना होऊ शकलेली नसल्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची निवडणुक पार पडली असतानाच, आता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेने जनगणना प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे १५ वर्षानंतर शहराची जनगणना होणार आहे. दोन टप्प्यात जनगणना केली जाणार असून यात ऑनलाईनद्वारे नोंदणी होणार आहे. देशात प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना केली जाते. यामुळे देशातील नागरिकांचा अचूक आकडा उपलब्ध होतो. याद्वारे नागरिकांपर्यंत आवश्यक त्या योजना पोहचविणे शक्य होते. या लोकसंख्येच्या आधारेच निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करून निवडणुका घेण्यात येतात.
संपुर्ण देशात २०११ साली जनगणना झाली होती. यामध्ये ठाणे शहराची लोकसंख्या १२ लाख ६१ हजार ५१७ इतकी आढळून आली होती. या लोकसंख्येवर २०१२ आणि त्यानंतर २०१७ मध्ये पालिकेच्या निवडणुका पार पडल्या. २०१७ साली पालिकेची निवडणुक झाली, त्याचवेळी शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या घरात गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. तर, आता शहराची लोकसंख्या २६ लाखांच्यापुढे असल्याचे बोलले जात आहे. दहा वर्षांनी म्हणजेच, २०२१ साली जनगणना होणार होती. मात्र, याच काळात करोनाचा संसर्ग वाढला. यामुळे जनगणना होऊ शकली नाही. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकाही २०११ च्या जगणनेनुसार घेण्यात आल्या.
दरम्यान, केंद्र सरकारने ‘जनगणना २०२७’ ची घोषणा केली असून त्यासाठी सर्वच शहरात जनगणनेची प्रक्रीया सुरू झाली असून अशीच प्रक्रिया ठाण्यातही सुरू झाली आहे. दोन टप्प्यात जनगणना जनगणनेसाठी ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ५,७०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक सहा प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहे. एका प्रगणकाला १८० ते २०० नागरिकांची नोंदणी करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. जनगणनेपूर्वी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांकडे उपलब्ध असलेला जन्म-मृत्यू, कुटुंब नोंदणी व इतर लोकसंख्याविषयक डेटा संकलित करून त्याची छाननी केली जात आहे. आरोग्य सेविका या लसीकरण आणि इतर माध्यमातून नागरिकांच्या घरी जातात. त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच १ ते १५ मे या कालावधीत ही कामे केली जाणार आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच, १६ मे ते १४ जून या कालावधीत घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती नोंदविली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या निदर्शेनुसार ठाणे महापालिकेने जनगणना करण्याची तयारी सुरू केली आहे. दोन टप्प्यातही ऑनलाईन पद्धतीने जनगणना केली जाणार आहे. या साठी प्रगणक नेमला जाणार असून त्याच्याकडे १८० ते २०० नागरिकांची जबाबदारी दिली जाणार आहे. प्रत्येक सहा प्रगणकांच्या मागे एक पर्यवेक्षक नेमला जाणार आहे. –प्रशांत रोडे , अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका
