ठाणे – ठाणे महापालिका निवडणुक निकालानंतर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या तिन्ही पक्षांपाठापोठ भाजपने पालिकेतील गटनेत्याची नुकतीच निवड केली आहे. भाजप नगरसेवकांच्या गटाची कोकण आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली असून त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मुकेश मोकाशी यांची गटनेते पदी निवड करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. ठाणे पालिका निवडणुकीत १६ लाख ४९ हजार ८६९ मतदारांपैकी ९ लाख १७ हजार १२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यात ४ लाख ८३ हजार ६९८ पुरूष तर, ४ लाख ३३ हजार ३८५ महिला आणि ४० इतरांचा समावेश होता. या निवडणुकीसाठी एकूण ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामुळे १२५ जागांसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुक निकालानंतर सर्वच पक्षांनी कोकण आयुक्तांकडे पक्षाच्या नगरसेवकांची गट नोंदणी केली असून भाजपनेही अशाचप्रकारे नुकतीच गट नोंदणी केली. तसेच पक्षाच्या गटनेत्याची निवड केली.

ठाणे महापालिकेती ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांची भाजपने गटनेते पदी निवड केली आहे. मुकेश मोकाशी यांनी १९९४ सालापासून स्वामी विवेकानंद नगर (जुना म्हाडा), पवार नगर, वसंत विहार परिसरातून शिवसेना शाखेच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात केली. २००७ साली भारत विकास परिषद,वसंत विहार शाखेच्या माध्यमातून समाजकार्य सुरू केले.

२०१० साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्तक नगर मंडळाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१२ साली ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र.३ मधून ते विजयी झाले होते. २०१४-१५ साली ठाण्याचे उपमहापौर झाले. २०१७ साली दुसऱ्यांदा प्रभाग क्र.४ मधून त्यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली. तत्कालीन महापौर हरिश्चंद्र श्रीपत पाटील यांना पराभूत करत ते विजयी झाले होते. २०१६ ते २०१९ पर्यंत पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस म्हणून काम करत होते. २०२२ ते २०२४ पर्यंत पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष म्हणून काम केले. आता पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.