ठाणे : ठाणे महापालिकेत महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत, छोट्या-मोठ्या कुरबुरी असतील तर त्या दूर केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असले तरी, गेल्या तीन महिन्यात शिंदेच्या शिवसेनेला १५४ कोटी, भाजपला केवळ ३ कोटी ५ लाखांचा निधी मिळाल्याचे समोर आले आहे. भाजपच्या तुलनेत विरोधी पक्षात असलेल्या दोन्ही राष्ट्रवादीसह एमआयएम मात्र ४ कोटी ४५ लाखांचा निधी मिळाला असून यामुळे भाजप सत्तेत असूनही उपरी असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेतील प्रभागनिहाय निधी वाटपाच्या आकडेवारीवरून महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना आणि भाजप नगरसेवकांना देण्यात आलेल्या निधीमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या आतापर्यंत चार सर्वसाधारण सभा झाल्या असून त्यातील मागील तीन सभेत मंजुर झालेल्या प्रस्तावांच्या आधारे त्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागांसाठी तब्बल १५४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १५ ला सर्वाधिक १५.५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक २० ला १४.०५ कोटी, प्रभाग क्रमांक २२ ला १३.३३ कोटी, प्रभाग क्रमांक १९ ला १३.२६ कोटी आणि प्रभाग क्रमांक २८ ला १२ कोटी निधी देण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक १ ला ११ कोटी, प्रभाग क्रमांक १६ ला ७.३९ कोटी, प्रभाग क्रमांक ६ ला ६.५ कोटी, तर प्रभाग क्रमांक १२ आणि १७ ला प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक ७ ला ४.२७ कोटी, प्रभाग क्रमांक २४ ला ३.५७ कोटी, प्रभाग क्रमांक १८ ला २.६५ कोटी, प्रभाग क्रमांक ९ ला २.५ कोटी, प्रभाग क्रमांक ३ ला २ कोटी आणि प्रभाग क्रमांक ८ ला १.६० कोटी निधी देण्यात आला आहे. काही प्रभागांना लाखांच्या स्वरूपात निधी मंजूर करण्यात आला असून, प्रभाग क्रमांक २७ ला ७५ लाख, प्रभाग क्रमांक १४, २५ आणि २९ ला प्रत्येकी ५० लाख, प्रभाग क्रमांक १३ ला ११ लाख आणि प्रभाग क्रमांक ३१ ला ३ लाख निधी मंजूर करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे भाजप नगरसेवकांच्या प्रभागांना मिळालेल्या निधीची रक्कम केवळ ३ कोटी ५ लाख इतकी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. भाजपच्या प्रभाग क्रमांक २ ला १.५ कोटी, प्रभाग क्रमांक ४ ला ६० लाख, प्रभाग क्रमांक ११ ला ३० लाख, प्रभाग क्रमांक १२ ला १६ लाख आणि प्रभाग क्रमांक २१ ला ४९ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीसह एमआयएम मात्र ४ कोटी ४५ लाखांचा निधी मिळाला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या प्रभाग क्रमांक १० ला २ कोटी, शरद पवार गटाचे नगरसेवक तसेच विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्या प्रभाग क्रमांक ३२ ला १.५ कोटी, प्रभाग क्रमांक २६ ला ७० लाख, एमआयएमचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्रमांक ३० ला १३ लाख आणि प्रभाग क्रमांक ३३ ला १२ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी वाटपावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, महायुतीत शिवसेना-भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आम्ही युती धर्म पाळत नाही, असा आमच्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी आरोप करतात. पण, युतीत असूनही आमच्या नगरसेवकांना जेमतेम ३ कोटी ५ लाखांचा निधी मिळाला आहे. तर, विरोधी पक्षातील राष्ट्रवादीला त्याहून अधिक निधी मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या सभेत ४३२ कोटींचे प्रस्ताव मंजुर झाले त्यात विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांना ३० ते ३२ कोटींचा निधी मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिली.