ठाणे : उथळसर येथील नालेसफाई असमाधानकारक केल्याप्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे. जे. एफ. इन्फ्राटेक या कंपनीच्या ठेकेदारास काळया यादीत टाकले आहे. संबंधितास पुढील तीन वर्षाकरिता ठाणे महापालिकेत कुठल्याही प्रकारच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. उथळसर भागातील नालेसफाईची कामे चांगल्या दर्जाची होत नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडूनही वेळोवेळी उथळसर प्रभाग समितीतील विविध नाल्यांमध्ये नालेसफाई व्यवस्थित पद्धतीने होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्याकडून जीवाला धोका असल्याची पीडित महिलेची तक्रार




याबाबत मे. जे. एफ. इन्फ्राटेक या कंपनीच्या ठेकेदारास नोटीसा काढून दंडही आकारण्यात आला होता. नालेसफाईचे काम अत्यंत असमाधानकारक होत असल्याचे व त्यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याबाबत ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली होती. तसेच १ लाख १५ हजार रुपये दंड ही आकारण्यात आला होता. दरम्यान, नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी २ जून ला उथळसर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या नाल्यांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत नापसंती दर्शविली. ठेकेदारास काळ्या यादीत का टाकण्यात येवू नये याचा खुलासा मागविण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मे. जे. एफ. इन्फ्राटेक ठेकेदारास महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटीस संदर्भात ठेकेदाराने कोणताही समाधानकारक खुलासा सादर केलेला नाही, तसेच तो आपल्या कामामध्ये सुधारणा करण्यामध्ये पूर्णत: अपयशी ठरल्यामुळे मे. जे. एस इन्फ्राटेक या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय बांगर यांनी घेतला. तसेच संबंधितास पुढील तीन वर्षाकरिता ठाणे महापालिकेत कुठल्याही प्रकारच्या निविदेमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे.