ठाणे : तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील ३७ पैकी १५ तलावांमध्ये मासेमारी आणि बोटींग सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे तलाव साफसफाई, निगा आणि देखभालीवर होणाऱ्या ३५ ते ४० लाखांचा खर्चात बचत होऊन पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय, ठाणेकरांना बोटींगची सुविधा मिळणार असल्याने त्यांची तलाव परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.

एकेकाळी ठाणे महापालिका क्षेत्रात ७० हून अधिक तलाव होते. यामुळेच ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षात अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष पावले असून सद्यस्थितीत ३७ तलाव शिल्लक राहिले आहेत. या तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात तलाव परिसरांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता १५ तलावात मासेमारी आणि बोटींग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामाचा ठेका पाच वर्षांसाठी देण्यात येणार असून यासंबंधिचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या १८ मार्चला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

कचराळी, खारेगाव, कौसा, न्यू शिवाजीनगर (कळवा), फडकेपाडा आणि मखमली हे तलाव मासेमारी, बोटींगसाठी देण्यासह निगा आणि देखभालीकरिता महापालिकेने २०१७ मध्ये निविदा काढली होती. पाच वर्षे भाडे तत्वावर देण्यासाठी ही निविदा काढली होती. मात्र, फडकेपाडा आणि मखमली तलावांच्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

तर, कौसा, खारेगाव, न्यू शिवाजीनगर आणि कचराळी तलावांच्या निविदेला प्रतिसाद मिळाला होता. डिसेंबर २०२२ मध्ये या ठेक्याची मुदत संपल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, प्रशासनाने आता पुन्हा १५ तलाव मासेमारी आणि बोटींगसाठी भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३७ तलाव आहेत. अनेक तलाव हे नागरी वस्तीत आहेत. अनेक तलावांच्या परिसरात बागबगीचा आहे. ही ठिकाणे नागरिकांसाठी मनोरंजनाची केंद्र बनली आहेत. या १५ तलावांच्या स्वच्छता, देखभाल, बोटींग सुविधा आणि इतर कामांसाठी महापालिकेला दरवर्षी सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे तलाव मासेमारी आणि बोटींगसाठी दिल्यास या खर्चात बचत होऊन महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे.

या तलावात बोटींग

ठाणे महापालिका क्षेत्रातील कौसा, खारेगाव, न्यू शिवाजीनगर, कचराळी, सिद्धेश्वर, देवसर, मोघरपाडा, फडकेपाडा, कासारवडवली, मखमली, रेवाळे, दातिवली, खिडकाळी, खर्डी आणि देसाई या १५ तलावात बोटींग आणि मासेमारी सुरू करण्यात येणार आहे. किमान एक मोटार बोट (एलपीजी) आणि दोन पेडल बोटी ठेवण्याची अट असेल. तसेच तलावांची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, कचरा व्यवस्थापन आणि परिसराची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार आहे.