ठाणे : ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. स्विकृत नगरसेवक पदासाठी निवडणुकीत पराभूत झालेले आणि पक्ष नेत्यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांनी पक्ष नेत्यांकडे लाॅबिंग सुरू केली आहे. त्याचबरोबर परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्य पदावर वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छूक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय सभेच्या पटलावर नसला तरी, हा विषयही सभेच्या पटलावर आणण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. यानंतर आता नगरसेवक संख्याबळानुसार, स्थायी समिती, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय पहिल्या सभेच्या पटलावर होता. मात्र, तो अचानकपणे मागे घेण्यात आला होता. आता ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा येत्या ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यात स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय नाही. परंतु शुद्धीपत्रक काढून हा विषयही पटलावर आणण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.
ठाणे पालिकेतील पक्षीय बलाबलानुसार, स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. शिंदे सेनेचे १०, भाजप ३, राष्ट्रवादी (शरद पवार) १ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) १ आणि एमआयएम १ असे १६ सदस्य नियुक्त होतील. शिक्षण समिती, आरोग्य समिती, महिला व बालकल्याण समिती, क्रिडा समाजकल्याण व सांंस्कृतिक समिती, झोपडपट्टी पुनर्वसन समिती या पाच विशेष समित्यांवर ९ सदस्यांची निवड केली जाणार आहे. नगरसेवकांमधून हे सदस्य निवडले जाणार आहेत. परिवहन समितीत एकूण १३ सदस्य असतात. त्यापैकी एक पदसिद्ध सदस्य असतो. तर, उर्वरित १२ सदस्यांची निवड केली जाणार आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेकजण इच्छूक असून हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी नेत्यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पक्षासाठी किती कष्ट केले, याचे दाखलेही इच्छूक नेत्यांना देत आहेत.
ठाणे महापालिका स्विकृत नगरसेवक आणि परिवहन समिती सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी बुधवारपासून मुख्यालयातून अर्ज वितरित करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत अर्ज वितरित करण्यात येणार होता. यामुळे अनेक इच्छूक अर्ज घेण्यासाठी कार्यालयात गेले मात्र, अर्जच उपलब्ध नसून अर्ज वितरण बंद झाल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आल्याचा दावा इच्छूकांनी केला.
ठाणे महापालिका स्विकृत नगरसेवक आणि परिवहन समिती सदस्यांची निवडीसाठी ५ मार्च रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, ही सभा पुढे ढकलण्याबाबत विचार राजकीय पातळीवर सुरू असल्याचे समजते. नावे अंतिम झालेली नसल्यामुळेच सभा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

