ठाणे : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेची निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र निवडणुकीनंतरही महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसह स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती तसेच इतर विषय समित्या अद्याप गठीत झालेल्या नाहीत.

यामुळे इच्छूकांमधून नाराजीचा सूर उमटत असतानाच, आता त्यावर भाजप आमदार संजय केळकर यांनीही प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचेही काही कारण नाही. लवकरात लवकर निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली.

तर, शिवसेना (शिंदे ) गटाचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांची सभागृह नेता पदावर तर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक शानु पठाण यांची विरोधी पक्ष नेता पदावर निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीची सत्ता असून या दोन्ही पक्षाचे १३१ पैकी १०४ नगरसेवक आहेत.

इतके असतानाही पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण मंडळ, परिवहन समिती, पाच विषय समित्या गठीत होऊ शकलेल्या नाहीत आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्ती झालेली नाही. यामुळे अनेक इच्छूकांचा हिरमोड झाला असून त्यावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाण्यातील कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार संजय केळकर यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

आमदार केळकर काय म्हणाले

ठाणे महापालिकेतील समित्या गठीत करण्याचे प्रकरण नेमकं कुठे अडलंय गेले, याबाबत मला स्वतःलाही पूर्ण माहिती नाही. कारण अडीच महिने झाले आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये एवढ्या वर्षांनंतर निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. त्यांना त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक अधिकार आणि जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. या समित्यांवर त्यांची निवड करून त्यांना योग्य प्रकारे अधिकार देण्याची गरज आहे, असे मला वाटते. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचारणा करावी लागेल. मी सुद्धा निश्चितपणे त्यांना विनंती करेन की ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. कारण अनेक महापालिकांमध्ये समित्या स्थापन झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेतही बहुमत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. आमच्या बाजूने या विषयात कोणताही अडथळा नाही आणि अडवण्याचेही काही कारण नाही. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे केळकर म्हणाले.

वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे

बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या मताचा उल्लेख करत केळकर म्हणाले की, पूर्वी जे घडले नव्हते ते आता होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे. देशासह जगभरात बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण आणि प्रसार होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.