scorecardresearch

ठाणे शहराची शंभर टक्के लसीकरणाच्या दिशेने वाटचाल; केवळ १.८३ टक्के नागरिकांचे लसीकरण शिल्लक

शहरात आतापर्यंत लशीची पहिली आणि दुसरी मात्रा असे मिळून एकूण ३० लाख ४५ हजार १३४ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १८ वर्षांपुढील नागरिकांचे करोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा घेण्याचे प्रमाण ९८.१७ टक्क्यावर पोहचले आहे. त्यात ९०.८७ टक्के नागरिकांनी पालिका क्षेत्रात तर, ९.१३ टक्के नागरिकांनी पालिका क्षेत्राबाहेर लस घेतल्याची बाब पालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. उर्वरित १.८३ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलली असून त्यासाठी घरोघरी जाऊन अशा नागरिकांचा पालिकेच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे. यामुळे ठाणे शहराची शंभर टक्के लसीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. पालिकेच्या ५० हून अधिक केंद्रांवर नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. याशिवाय, प्रभागांमध्ये पालिकेकडून विशेष लसीकरण शिबीरे आयोजित करण्यात येत होती. तसेच आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’ हा उपक्रम राबवून त्यात घरोघरी जाऊन लसीकरण केले होते. ठाणे शहरातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी पालिकेकडून असे उपक्रम हाती घेऊन लसीकरणाचा वेग वाढविला होता. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शहरात आतापर्यंत लशीची पहिली आणि दुसरी मात्रा असे मिळून एकूण ३० लाख ४५ हजार १३४ इतके लसीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन बालकांना पोलिओचे डोस दिले. त्याचबरोबर करोना लस घेतलेली नाही अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांचेही लसीकरण केले. या मोहिमेत पालिकेच्या पथकाने ६ लाख ५२ हजार ५८ घरांना भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेतला. त्यात १३ लाख १४ हजार ४९९ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून त्याचे प्रमाण ९८.१७ टक्के इतके आहे. त्यापैकी ११ लाख ९४ हजार ५४७ नागरिकांनी पालिका क्षेत्रातच लशीची पहिली मात्रा घेतली असून त्याचे प्रमाणे ९०.८७ टक्के इतके आहे. तर, १ लाख १९ हजार ९५२ म्हणजेच ९.१३ टक्के नागरीकांनी पालिका क्षेत्राबाहेर लशीची पहिली मात्रा घेतली आहे. उर्वरित २४ हजार ५७२ म्हणजेच १.८३ टक्के लसीकरण शिल्लक आहे. या संदर्भात महापालिकेचे आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, २४ हजार ५७२ नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत ८५ हजार ४० मुलांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून त्याचे प्रमाण ८८ टक्के इतके आहे. तर, ६३ हजार ३५३ मुलांनी लशीची दुसरी मात्रा घेतली असून त्याचे प्रमाण ६५ टक्के इतके आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane municipal corporation completed covid 19 vaccination near about 100 percent vsk