scorecardresearch

एच३एन२चा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे पालिकेकडून उपाययोजना, खासगी डॉक्टरांचा बनवला WhatsApp ग्रुप

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या १५ दिवसात एच ३ एन २ आजाराच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

whatsapp group of private doctors in thane
खासगी डॉक्टरांचा व्हॉटसॲप ग्रुप (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

ठाणे : शहरात करोना आणि एच ३ एन २ इन्फ्लुएन्झा आजाराचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून नागरी आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांनी खाजगी डॉक्टरांचे व्हॉटसॲप ग्रुप बनविले आहेत. आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर नागरिक सर्वप्रथम खाजगी डॉक्टरांना संपर्क करतात. त्यांच्याकडून योग्य उपचार मिळाले नाही तर पुढे गंभीर परिणाम होवू शकतात. असे प्रकार घडू नयेत या उद्देशातून पालिकेने खाजगी डॉक्टरांशी समन्वय ठेवण्यासाठी ही उपाययोजना केली आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नाही ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या १५ दिवसात एच ३ एन २ आजाराच्या २५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बरेच नागरिक आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर सर्वप्रथम खाजगी डॉक्टरांना संपर्क करतात. त्यांच्याकडून योग्य उपचार मिळाले नाही तर पुढे गंभीर परिणाम होवू शकतात. यासाठी खाजगी डॉक्टरांना आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय, नागरी आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांनी खाजगी डॉक्टरांचे व्हॉटसॲप ग्रुप बनविले असून त्याद्वारे खाजगी डॉक्टरांशी समन्वय ठेवला जात आहे. तापाचा रुग्ण आल्यानंतर कोणती कार्यवाही करावी याची मार्गदर्शक प्रणाली तयार करुन ती सर्वच खाजगी डॉक्टरांना वितरित केली आहे. एखाद्या रुग्णामध्ये एच ३ एन २ च्या आजाराची लक्षणे आढळून आली तर त्वरीत संबंधित क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा >>> बेकायदा बांधकाम तोडण्यावरुन कल्याणमधील सापर्डे गावात दोन गटात राडा

एच ३ एन २ आजाराची कोणतीही लक्षणे दिसू लागली तर चाचणीच्या निकालाची वाट न पाहता तत्काळ उपचार सुरू करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी शहरातील सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनीही कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केली आहे. आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांना याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात. गरज भासल्यास बैठक घ्यावी, माहिती पत्रकांचे वाटप करावे. आरोग्य केंद्रांच्या व्हॉट्सॲप समूहात मार्गदर्शक सूचनांची माहिती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. इन्फ्लुएन्झाचे प्रमाण वाढत असले तरी काही गोष्टीची काळजी घेतली तर आपण हा आजार टाळू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

इन्फ्लुएन्झाची लक्षणे

सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, धाप लागणे, छातीत दुखणे, खोल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर – काळी पडणे, मुलांच्यामध्ये चीडचीड, अशी इन्फ्लुएन्झाची लक्षणे आहेत.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेवू नये

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टिक आहार घ्यावा. धूम्रपान टाळावे. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करावा, असे इन्फ्लुएन्झा टाळण्यासाठी करावे. तर, हस्तांदोलन टाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेवू नये, आपल्याला फ्लू सदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जावू नये, असेही पालिकेने म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 17:39 IST

संबंधित बातम्या