ठाणे : ठाणे शहरात खाडी किनारी मार्ग, अंतर्गत मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मुख्य मेट्रो अशा विविध सरकारी प्रकल्प आणि इमारतींसाठी सर्रास बेसुमार वृक्षतोड होत असतानाच, शहरातील १५० वर्ष जुन्या वट वृक्षावर रस्ता रुंदीकरणासाठी कुऱ्हाड चालविण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. वारसा वृक्ष असूनही वृक्ष तोडले जाण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयी पर्यावरणवाद्यांनी आक्षेप नोंदविला आहे. तसेच महापालिकेकडे सूचना, हरकती पाठविण्यास सुरुवात केली आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनीही महापालिकेविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले. काही वर्षांपूर्वी कोलशेत भागात देखील ३०० वर्षाच्या वट वृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर हे वृक्ष वाचविण्यात यश आले होते.
ठाणे शहरात गेल्याकाही वर्षांपासून विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. या कामांसाठी रस्त्यालगत किंवा पदपथालगत असलेल्या वृक्षांची तोड केली जात आहे. शहरात इमारती बांधकामासाठी देखील बांधकाम व्यवसायिकांना वृक्षतोडीची परवानगी दिली जाते. काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने अंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी तब्बल ३ हजार वृक्षांची तोड करण्यास परवानगी दिली. असे असतानाच बाळकुम येथील राम मारुती रोड मार्गावरील सुमारे १५० वर्ष जुने वारसा वृक्ष रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.
प्रस्तावामध्ये वारसा वृक्षाचा उल्लेख तसेच कोणते वृक्ष तोडणार याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. वृक्षतोडीची नोटीस पर्यावरणवाद्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या वृक्षतोडीस विरोध करण्यास सुरवात केली आहे. महापालिकेने वृक्षतोडीस हरकती आणि सूचना पाठविण्यास सांगितले होते. घोडबंदरमधील शेकडो नागरिकांनी महापालिकेकडे वृक्ष तोडू नये यासाठी इ-मेलद्वारे हरकती आणि सूचना पाठविल्या आहेत.
कोलशेतमध्ये वटवृक्ष बचाव लढा पुन्हा पेटला
कोलशेत येथे यापूर्वी एका खासगी विकासकाने ३०० वर्ष जुन्या वटवृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न केला होता. यास नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला होता. या आंदोलनांमुळे ते वृक्ष वाचविण्यात यश आले. आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती ओढावली असून ठाणेकर पुन्हा एकदा एकवटले आहेत.
वृक्षतोडीबाबत महापालिकेवर गंभीर आरोप
ठाणे महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसमध्ये वृक्षाचे वय, प्रजाती, प्रकल्पाचे नाव आणि अचूक ठिकाणी याची माहिती जाणीवपूर्वक दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांना हरकती नोंदविणे शक्य होत नाही. नोटीसमध्ये मराठीत ‘नाल्याचे काम’ तर इंग्रजीत ‘रस्ता रुंदीकरण’ असा उल्लेख आहे.
हा प्रकार दिशाभूल करण्यासारखा आहे. रुंदीकरणासाठी वृक्ष कायमचे तोडणे हा पर्याय नाही. महापालिकेने प्रस्ताव मागे घ्यावी अन्यथा कायदेशीर मार्गाला कारवाईस सामोरे जावे लागेल. – रोहित जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.
ठाणे महापालिकेचे वृक्ष अधिकारी राजेश सोनवणे यांना संपर्क साधण्याचा तसेच संदेश पाठविला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
