ठाणे : महापालिका क्षेत्रातील बेकायदा नळजोडण्या खंडीत करण्याची विशेष मोहिम प्रशासनाने हाती घेतली असून यामध्ये दिवा आणि मुंब्रा भागातील ९७ बेकायदा नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. हि मोहिम यापुढेही सुरूच राहणार असल्यामुळे बेकायदा नळजोडणीधारकांचे धाबे दणाणले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवरून बेकायदा नळजोडण्या घेण्यात येतात. त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होऊन टंचाईची समस्या निर्माण होते. या टंचाईच्या झळा नियमित पालिकेची देयके भरणाऱ्या नळजोडणीधारकांना बसतात. याविरोधात तक्रारी येऊ लागताच पालिका प्रशासनाने आता अशा बेकायदा नळजोडण्या खंडीत करण्याची कारवई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात, पाणी देयक वसुलीबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता आणि मीटर रिडर यांची बैठक घेतली. या बैठकीत, मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अनधिकृत इमारतींमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्यास त्यावरही गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. या आदेशानंतर पाणी पुरवठा विभागाने मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील भोलेनाथ नगर, खरीवली, देवी नाला, ग्रीन पार्क येथील एक इंच व्यासाच्या ९७ बेकायदा नळ जोडण्या खंडित केल्या आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुरबाडमध्ये महायुतीतच एकमेकांवर कुरघोडी, भाजप शिवसेनेकडून एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी

मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये कल्याण फाटा येथून ६६० मीमी आणि ३५० मीमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमधून दररोज सुमारे ५७ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. या मुख्य जलवाहिनीवर काही नागरिकांनी बेकायदा नळ जोडण्या घेतल्याचे निर्दशनास आले होते. या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अशाचप्रकारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात बेकायदा नळ जोडण्या खंडीत करण्यात येणार असल्याचे उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले.