ठाणे : यंदाच्या वर्षात अपंग व्यक्तींच्या कल्याणासाठी तब्बल १४ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बेरोजगार भत्ता, विवाहासाठी अर्थसहाय्य, ज्येष्ठ दिव्यांगांना उदरनिर्वाह अनुदान, आरोग्य विमा आणि पुनर्वसन सेवांसह विविध योजनांचा समावेश आहे. या संबंधीच्या सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून येत्या २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.
ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अपंग व्यक्ती कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच, २०२५-२६ या आर्थिक वर्षात या योजनांसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यावेळी १२ हजार १८८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १० हजार ८८६ अर्ज पात्र ठरले असून या लाभार्थ्यांवर १३ कोटी ८ लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला होता.
यंदाच्या प्रस्तावात अपंग विद्यार्थ्यांना शालेय व उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, खेळाडूकरीता शिष्यवृत्ती यासह विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पालिकेकडून अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, यूडीआयडी कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.
लाभार्थी संख्या उद्दिष्टापेक्षा जास्त झाल्यास प्रभाग समिती स्तरावर लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे. योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, निधीचे पुनर्विनियोजन आणि गरजेनुसार योजनांमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचाही प्रस्ताव आहे. या संपूर्ण प्रस्तावाला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेपुढे मंजुरी साठी सादर करण्यात आला आहे.
