ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत मोठय़ा संख्येने उभ्या राहात असलेल्या बेकायदा बांधकामांना आळा घालण्याचे मोठे आव्हान येथील प्रशासकीय यंत्रणांपुढे असताना गेल्या काही वर्षांपासून विविध आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले कार्यालयीन उपअधीक्षक महेश आहेर यांच्याकडे अतिक्रमण विभागाच्या थेट सहायक आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून सोमवारी प्रशासक डॉ. विपीन शर्मा यांनी सुजाण ठाणेकरांना मोठा धक्का दिला. सत्ताधारी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळेच अहिर यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याकडे हे पद सोपविण्यात आल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे.

मुंब्रा येथील लकी कंपाउंड परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतरही बेकायदा बांधकामे रोखण्यात येथील प्रशासकीय यंत्रणांना यश आलेले नाही. खारेगाव, मुंब्रा, दिवा, ठाणे खाडीकिनारी असलेली खारफुटी कापून, भराव टाकून इमारती, गाळे उभारण्याची कामेही बिनदिक्कत सुरू आहेत.  दिव्यात खारफुटी कापून दोन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यापर्यंत भूमाफियांची मजल गेली होती. राजरोसपणे उभ्या राहणाऱ्या या बांधकामाच्या पायावर पोसल्या गेलेल्या ठाण्यातील भ्रष्ट अशा राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेला डॉ. विपीन शर्मा यांच्या प्रशासकीय राजवटीत तरी पायबंद असेल ही ठाणेकरांची अपेक्षा होती. सोमवारी महेश आहेर या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या अतिक्रमण विभागातील नियुक्तीमुळे या अपेक्षांना सुरुंग लागल्याची चर्चा  आहे.

कार्यालयीन उपअधीक्षक या पदावर असलेल्या अहिर यांच्याकडे यापूर्वीच सहायक आयुक्तपदाचा कार्यभार सोपवून प्रशासनाने नियमांचा भंग केल्याची तक्रार आहे. असे असताना अतिक्रमण नियंत्रण विभागाचे संनियंत्रण समन्वयाची जबाबदारी आयुक्तांनी अहिर यांच्याकडे सोपवली आहे. शैक्षणिक पात्रता,  पदोन्नत्या,  अधिक काळाचे प्रभारीपद, बोगस ताबापत्रांच्या बाबतीत झालेल्या स्वाक्षऱ्या याबाबत अहिर यांच्यावर यापूर्वीही आरोप झाले आहेत.  याशिवाय बीएसयूपीच्या घरांचा घोटाळा, अनधिकृत बांधकामे, त्यांची संपत्ती, अतिरिक्त पोलीस संरक्षण या मुद्दय़ावरूनही अहिर हे यापूर्वी वादात सापडले आहेत. या सगळय़ा आरोपांचा यापूर्वी अहिर यांनी इन्कार केला  आहे.   

दरम्यान, महापालिकेतील कार्यालयीन उपअधीक्षक महेश आहेर यांची शैक्षणिक पात्रता, देण्यात आलेल्या पदोन्नत्या, विहित कालावधीपेक्षा अधिक काळाचे प्रभारीपद, बोगस ताबापत्रांच्या बाबतीत पुरावे देऊनही आयुक्तांनी त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. त्यांना ठाण्यातील मातोश्रीचा राजाश्रय असल्यामुळेच चांगली मलईदार पदे मिळत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. यासंबंधी आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

राष्ट्रवादीला धक्का

महेश अहिर यांच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच प्रश्न उपस्थित करत आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. दिवा भागाचा कार्यभार अहिर यांच्याकडे असताना या भागात बेकायदा बांधकामांना पेव फुटल्याची टीकाही झाली होती. याशिवाय उपायुक्त मनीष जोशी यांच्या कारभारावर टीका करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यंतरी ट्विट करत अैाषधालयाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याची जाहीर टीका केली होती. असे असताना जोशी यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन आणि अहिर यांच्याकडे अतिक्रमण नियंत्रकासारखे मलईदार खाते सोपवून शिवसेनेने प्रशासकाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धक्का दिल्याची चर्चा आहे.

माझे पदवीचे प्रमाणपत्र अधिकृत असल्याचे संबंधित विभागाने महापालिकेला कळविले आहे. आतापर्यंत ज्याठिकाणी काम केले आहे त्याठिकाणी बेकायदा बांधकामांवर सर्वाधिक कारवाई मी केली आहे. त्याचबरोबर एमआरटीपी आणि बॅनर हटविण्याची कारवाईदेखील सर्वाधिक केली असून माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी हा तपशील तपासून पहावा. मी करत असलेल्या कारवाईमुळे दुखावलेल्या मंडळींकडून हे आरोप सत्र सुरू आहे. राजकीय पक्ष नव्हे तर काही नेते वैयक्तिक आरोप करत आहेत. प्रशासन जी जबाबदारी सोपवते ती जबाबदारीने पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो.  – महेश आहेर, सहाय्यक आयुक्त, ठाणे महापालिका