ठाणे – ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना जाहीर झालेले २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान इतर महापालिकांच्या तुलनेत तुटपुंजे असल्याचा आरोप करत म्युनिसिपल लेबर युनियनने पालिका प्रशासनाला थेट धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेशी कोणतीही चर्चा केली नाही आणि एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत युनियनने ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा आग्रह धरला आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावरच कामगारांनी प्रशासनाविरोधात दंड थोपटल्याने संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावरून प्रशासन आणि कामगार युनियनमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महापालिका प्रशासनाने २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. मात्र, कामगार संघटनेने ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी कोणतीही चर्चा केली नाही आणि एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत म्युनिसिपल लेबर युनियनने गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवी राव, कार्याध्यक्ष मोहन तिवारी, उपाध्यक्ष बिरपाल भाले, सरचिटणीस चेतन आंबोणकर आणि कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी कामगारांच्यावतीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवदेन दिले असून त्यात प्रशासनाच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी ३० ऑक्टोबर रोजी २५ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. मात्र, कामगारांच्या मागण्यांचा विचार न करता आणि मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा न करता ही घोषणा करण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे.

या निर्णयामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून दिवाळीच्या सणातच आंदोलन करण्याची वेळ आल्याचे युनियनने म्हटले आहे. इतर महापालिकांच्या तुलनेत ठाणे मागे राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाची आकडेवारीही युनियनने आयुक्तांना दिलेल्या निवदेनात नमुद केली आहे. नवी मुंबई महापालिकेने ४५ हजार, पनवेल महापालिकेने ३५ हजार ५००, मुंबई महापालिकेने ३३ हजार, नाशिक महापालिकेने ३१ हजार ५००, पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३० हजार, तर खोपोली आणि उरण नगरपालिकांनी प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. त्या तुलनेत ठाणे महापालिकेचे २५ हजार रुपयांचे अनुदान अत्यंत कमी आहे.

दिवाळीपूर्वी प्रशासनाने संघटनेशी चर्चा करून सन्मानजनक सानुग्रह अनुदान जाहीर करावे, अन्यथा आंदोलन अटळ आहे, असा इशारा सरचिटणीस चेतन आंबोणकर यांनी दिला आहे. इतर प्रलंबित मागण्यांवरही नाराजी केवळ सानुग्रह अनुदानच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवरही प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप युनियनने केला आहे.

१०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना वेतनात लागू करणे, शैक्षणिक भत्ता, वैद्यकीय विमा आणि अन्य भत्त्यांमध्ये वाढ करणे, सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देणे आदी मागण्या प्रलंबित आहेत. तसेच कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युइटी आणि भविष्य निर्वाह निधीचा हिशेब देणे, बंद झालेली कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) पुन्हा सुरू करणे आणि किमान वेतनाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता देणे या मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.