मतदारांना भुलवण्यासाठी मुक्त विद्यापीठांकडून पदवी शिक्षण

निवडणुकीच्या प्रचारात सर्वसामान्य नागरिक दबक्या आवाजात का होईना लोकप्रतिनिधींच्या शिक्षणाचा अनेकदा उद्धार करत असतात. ठाणे शहरातील लोकप्रतिनिधींनी मात्र ही बाब चांगलीच मनावर घेतलेली दिसून येते. विविध कारणांनी शिक्षण अर्धवट सोडून राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या या मंडळींनी देशभरातील विविध मुक्त विद्यापीठांचा आधार घेत उच्च शिक्षणाचा टिळा लावून घेतला आहे. त्यातील सर्वाधिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने आधार दिला आहे.

निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या तपशीलावरून ही माहिती उघड होत आहे. ठाण्याचे महापौरपद भूषविलेले अशोक वैती पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत. शिक्षणासाठी वयाची अट नसते. इच्छा असेल तर कधीही अभ्यास करून पदवी मिळविता येते. अशोक वैती यांनीही गेल्या वर्षी (२०१६) यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. अशोक वैती यांच्या पावलावर पाऊल टाकीत रमाकांत मढवी यांनीही चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली आहे. ठाण्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ मानल्या जाणाऱ्या देवराम भोईर यांनीही अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यातून २०१३ मध्ये ते बारावी उत्तीर्ण झाले आहेत. मंदार विचारे यांनी राजस्थान येथील विद्यापीठातून तांत्रिकी शिक्षण घेतले आहे.

ठाण्यासारख्या सांस्कृतिक नगरीत निवडणुकीची तयारी करताना इतर गोष्टींप्रमाणेच आपले अर्धवट राहिलेले शिक्षणही पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न उमेदवारांनी केलेला दिसतो. २०१७ च्या निवडणुकीसाठी एक वर्षआधीच पदवी पदरात पाडून घेण्याचे टायमिंग या राजकीय मंडळींनी साधले आहे. त्यातही काही चतुरांनी फक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आपली पुढे शिकण्याची इच्छा असल्याचे फक्त दाखवून दिले आहे. निवडणूक अर्ज भरताना पदवी परीक्षेसाठी वर्गात नाव घातले आहे, हे नमूद करण्यास ते विसरलेले नाहीत.

उमेदवार आणि त्यांचे शिक्षण

* देवराम भोईर : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१३ मध्ये बारावी उत्तीर्ण

* उषा भोईर : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१२ साली बारावी उत्तीर्ण

* संजय भोईर : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१५ साली पदवी

* उमेश पाटील : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१२ साली बारावी उत्तीर्ण

* सुहास देसाई : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१६ साली पदवी

* मंदार विचारे : राजस्थान विद्यापीठातून २०१५ साली तांत्रिकी शिक्षण

* अशोक वैती : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१६ साली पदवी

* रमाकांत मढवी : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१६ साली पदवी

* सुधीर कोकाटे : यशवंतराव मुक्त विद्यापीठातून २०१६ साली पदवी