ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असतानाही दिवे, पंखे तसेच वातानुकूल यंत्रणा सुरू ठेवली जात असल्याची गंभीर बाब आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी विजेचा अपव्यय रोखण्यासाठी परिपत्रक काढत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे. विशेषतः वातानुकूल यंत्रणा सुरू असताना दालनांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचे निर्देशही दिले असून याचे पालन झाले नाहीतर संबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासह विविध प्रभाग समिती कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ट्युबलाईट, पॅनल लाईट्स, पंखे, वातानुकूल यंत्रणा आणि इतर विद्युत उपकरणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या दालनात नसतानाही ही उपकरणे सुरूच राहत असल्याचे आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आले आहे. इतकेच नव्हे तर अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरील शिपाई कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक जागेवर नसतानाही त्या ठिकाणचे पंखे आणि दिवे सुरू ठेवले जात असल्याचेही आढळले आहे.
याशिवाय वातानुकूलीत यंत्र सुरू असतानाही दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव यांनी विजेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी सर्व विभागप्रमुख, खातेप्रमुख, उपआयुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना याबाबत परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकानुसार, अधिकारी दालनात उपलब्ध नसताना त्या दालनातील दिवे, पंखे आणि इतर विद्युत उपकरणे बंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असणार आहे. तसेच दालनाबाहेरील परिसर किंवा इतर ठिकाणचे दिवे आणि पंखे विनाकारण सुरू राहणार नाहीत याची दक्षताही घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विभागप्रमुखांना जबाबदार धरणार
वातानुकूलीत यंत्रणा सुरू असताना संबंधित दालनांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. वातानुकूलीत यंत्रणा सुरू असताना दरवाजे किंवा खिडक्या उघड्या असल्याचे आढळल्यास संबंधित विभागप्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचा इशाराही आयुक्त राव यांनी दिला आहे.
तापमान २४ अंश किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा
भारत सरकारच्या ऊर्जा कार्यक्षमता विभागाच्या (ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी) नियमानुसार किनारी हवामान असलेल्या भागांमध्ये कार्यालयीन कामकाजासाठी २४ अंश सेल्सिअस तापमान पुरेसे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये वातानुकूल यंत्रणेचे तापमान २४ अंश किंवा त्यापेक्षा अधिक ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व विभागप्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत स्पष्ट सूचना देऊन विजेचा अपव्यय टाळण्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.
