ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील शिपाईला पाच हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी ठाणे न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड भरणे टाळल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.

तक्रारदार यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला ठाणे महापालिकेकडून नवी नळ जोडणी घ्यायची होती. यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्या मार्फत नळ जोडणीसाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे अर्ज केला होता. तसेच त्यांनी पाणी पुरवठा विभागातील शिपाई राजेश जाधव यांची भेट घेतली. तक्रारदार यांनी हे काम लवकरात लवकर करण्याची विनंती जाधव यांना केली होती. परंतु जाधव यांनी त्यांच्याकडून या कामासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

सापळा कारवाईत शिपाई राजेश जाधव याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्याची अंतिम सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी राजेश जाधव याला एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना साधी कैद असेल.

याप्रकरणात साहाय्यक सरकारी वकील संजय बी. मोरे यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले. तर पोलीस निरीक्षक दीपक दळवी यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच न्यायालय पैरवी अमलदार म्हणून पोलीस हवालदार अनिता उमेश पाटील आणि पोलीस हवालदार सतीश विनायक ठाकरे यांनी समन्स बजावणीचे काम पाहिले.