ठाणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कायमस्वरुपी अधिकारी व कर्मचाऱ्यांना, परिवहन सेवेतील तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शुक्रवारी केली. याशिवाय, आशासेविकांनाही प्रत्येकी सहा हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येईल. दिवाळीपूर्वी ही रक्कम बँक खात्यात जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर २० कोटी ११ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात येते. गेल्या काही वर्षांत महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात सातत्याने वाढ झाली आहे. २०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात आले होते. २०२४-२५ मध्ये ही रक्कम २४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचली होती.

यंदा सानुग्रह अनुदान देण्याबाबत पालिकेत एक बैठक पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सानुग्रह अनुदानाबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, सर्वपक्षीय गटनेते आणि महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर यंदाच्या आर्थिक वर्षासाठी कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ठाणे महापालिकेचे कायमस्वरूपी, कंत्राटी अशा ६, ६६२ कर्मचारी व परिवहन सेवेतील १,२८५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तर ६७३ आशासेविकांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिवाळी विशेष भेट म्हणून देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर २० कोटी ११ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

२०२०-२१ मध्ये कर्मचाऱ्यांना १५,५०० रुपये अनुदान देण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात सातत्याने वाढ झाली आहे. २०२४-२५ मध्ये ही रक्कम २४,५०० रुपयांपर्यंत पोहोचली होती. यंदा त्यात आणखी वाढ करून २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.