ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती स्तरावर कार्यरत असलेल्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागातील ११६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढले आहेत. अतिक्रमण नियंत्रण विभागाचे काम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच विभागातील मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बदलीचे आदेश मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर राहणे बंधनकारक आहे. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

शहरातील विविध भागांत अतिक्रमणांविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. तसेच अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमणविरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य व परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वंकष आढावा घेत हा निर्णय घेतल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील ११६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

महापालिका प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले असून त्यांनी बदली झालेल्या ठिकाणी हजर राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बदली आदेशाचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. या बदल्यांमुळे प्रभाग स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण यंत्रणेला अधिक बळ मिळणार असून फेरीवाले, हातगाडीधारक आणि इतर अनधिकृत अतिक्रमणांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.