तिजोरीत केवळ ४० कोटी; ठेकेदारांची ८०० कोटींची देयके देण्याचा पेच

ठाणे : करोना संकटाच्या काळात मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीतून पालिकेला आर्थिक दिलासा मिळत असला तरी शहर विकास विभागासह इतर विभागांच्या उत्पन्नात अद्यापही अपेक्षित वाढ झालेली नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगारवगळता महापालिकेला रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये खर्च करावे लागत असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत केवळ ४० कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ठेकेदारांची थकलेली ८०० कोटी रुपयांची देयके द्यायची कशी, असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यापर्यंत पालिकेला यश आले होते. पण इतर विभागांच्या कराची अपेक्षित वसुली झाली नसल्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक फटका बसला होता. यामुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १३०० कोटी रुपयांनी कमी करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना दरवर्षीपेक्षा यंदा कमी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे, तरीही मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांना अद्यापही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला दरमहा वस्तू आणि सेवा करातून ७६ कोटी रुपयांचे अनुदान मिळते. या अनुदानाच्या रकमेतून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगार दिले जातात. या पगारावर सुमारे ७५ कोटी रुपयांच्या आसपास पैसे खर्च होतात. त्यातच रस्ते साफसफाई, पाणी खरेदी तसेच इतर आवश्यक कामांसाठी महिन्याकाठी ३० कोटी रुपये खर्च करावे लागत असून सद्यस्थितीत पालिकेच्या तिजोरीत केवळ ४० कोटी रुपये शिल्लक आहेत. यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation financial cycle is in shambles ssh
First published on: 25-08-2021 at 01:35 IST