ठाणे : ठाणे महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर आज, बुधवारी होणाऱ्या पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेच्या पटलावर तब्बल २६५ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. यात २०३ प्रस्ताव हे स्थायी समितीच्या अखत्यारितील आहेत. ही समिती गठीत होऊ शकलेली नसल्यामुळे ते सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले असून त्याचबरोबर नगरसेवकांनी विविध कामांच्या १६ प्रस्तावांच्या सुचना मांडल्या आहेत.

ठाणे महापालिकेच्या जानेवारी महिन्यात पार पडलेल्या निवडणूकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले. या निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्यात आली. यानंतर सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, गट नेता निवड करण्यात आली. यामुळे आतापर्यंत पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा पार पडली असून पालिकेची सर्वसाधारण सभा अद्याप झालेली नाही.

पालिकेची सर्वसाधारण सभा १८ मार्च रोजी होणार असून या सभेच्या पटलावर एकूण २६५ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. रुग्णवाहीका सुविधा, भटके श्वान निवारा, पादचारी पुल, माहिती तत्रज्ञान सुविधा व्यवस्थापन, यासह इतर विविध कामांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. या सभेच्या पटलावर एकूण ६२ प्रस्तावाच होते. मात्र, स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे या समितीच्या अखत्यारितील विषयही आहेत. असे एकूण २०३ स्थायी समितीचे विषय मंजुरीसाठी सभेपुढे ठेवण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्यापर्यंत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येत होती. मात्र, निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर २०३ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत होते. हेच प्रस्ताव आता मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहेत.

नगरसेवकांनी मांडले प्रस्ताव

नगरसेवकांनी विविध कामांच्या १६ प्रस्तावांच्या सुचना मांडल्या आहेत. यात दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करणे, परिवहन आगाराचे आरक्षण विकसित करणे, अभय योजना लागू करणे, रुग्णालय उभारणी, दिवा रेल्वे स्थानकाजवळी तलावाचे सुशोभिकरण, जलवाहीनी टाकणे, काँक्रीटीकरण, खारीगाव-पारसिकनगर येथे मार्केट उभारणे, वाहनतळ उभारणे, अशा कामांचा समावेश आहे.