ठाणे : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यापेक्षा कमी अर्थसंकल्प असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने वर्धापन दिन साजरा करण्याचे टाळत दुष्काळग्रस्तांना निधी दिला. मात्र, बळीराजा संकटात असतानाही ठाणे पालिकेने वर्धापनदिनासाठी उधळपट्टी केल्याची टिका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. तसेच स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांच्या चितेवर चिलीम शिलगावली,’ अशी टिकाही त्यांनी केली.
ठाणे महापालिकेचा ४४ वा वर्धापन दिन गुरूवारी साजरा करण्यात आला. दुष्काळामुळे बळीराजा संकटात असताना ठाणे महापालिकेने वर्धापन दिनाचा जल्लोष केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सत्ताधाऱ्यांना टिका केली आहे. करोना काळ तसेच ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने ठाणे महापालिकेकडून गेले चार वर्षे वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता. यंदा निवडणुका होऊन प्रशाकीय राजवट संपुष्टात आली असून यंदा प्रचंड उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चार वर्षानंतर हा वर्धापन दिन साजरा केला असला तरी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जल्लोष केला नसता तर काय बिघडले असते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कल्याण- डोंबिवली महापालिकेकडून वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करून २५ लाखांचा निधी दुष्काळग्रस्त बळीराजांसाठी देण्यात आला आहे. ठाणे महापालिकापेक्षा कमी अर्थसंकल्प असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने जर हा स्त्युत्य निर्णय घेतला असेल तर ठाणे पालिकेने आरशात पहायला हवे. उपमुख्यमंत्र्यांनीही सर्वाधिक निधी ठाणे महापालिकेला दिला आहे, असे म्हटले. याचाच अर्थ ठाणे महापालिका कल्याण-डोंबवली पालिकेपेक्षा श्रीमंत पालिका आहे. तरीही, जर सत्ताधाऱ्यांच्या सामाजिक जाणिवा बोथट झाल्या असतील तर त्यांची किव कराविशी वाटते, अशी टिकाही त्यांनी केली.
पाठ थोपवून घेण्याच्या नादात भान नसल्याची टीका
गेले चार वर्षे ठाणे महापालिकेने वर्धापन दिन साजरा केला नव्हता. आणखी एक वर्ष साजरा केला नसता तर आभाळ कोसळणार नव्हते. मात्र, ज्या बळीराजाच्या डोक्यावर आभाळ कोसळलले आहे, त्याच्या मदतीसाठी आपण अर्थसाह्य केले असते तर त्यातून ठाणे महापालिकेच्या सामाजिक जाणिवा प्रबळ आहेत, असा अर्थ निघाला असता. मात्र, स्वतःची पाठ थोपटून घेण्याच्या नादात सत्ताधारी वर्गाला कसलेच भान राहिलेले नाही. चितेवर चिलीम शिलगावण्याचाच हा प्रकार आहे, अशी टीकादेखील मनोज प्रधान यांनी केली.
दुष्काळग्रस्त बळीराजाची मागितली माफी
विरोधी पक्ष म्हणून आम्ही ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना याबाबत सूचना करायला हवी होती. मात्र, आम्ही ती वेळेवर केली नाही. या बद्दल आम्ही दुष्काळग्रस्त बळीराजाची माफी मागतो. तसेच, ठाणे महापालिकेनेही आपली चूक सुधारण्यासाठी दुष्काळ निवारणासाठी अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी करतो, असेही प्रधान म्हणाले.
