ठाणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार आहे. मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेने मोठा दिलासा दिला असून त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना मिळणार आहे.

ठाणे महानगरपालिकेकडून यंदाच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शाडू माती तसेच पर्यावरणपूरक साहित्य वापरून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी म्हटले आहे.

इच्छुक मूर्तिकारांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात १५ जून २०२६ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांची छाननी करून उपलब्धतेनुसार १५ जुलैपर्यंत जागा तसेच शाडू माती मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेकडून फक्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून शेड, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा मूर्तिकारांनी स्वतः उभाराव्या लागणार आहेत, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या महिला बचत गटांमार्फत तसेच वर्तकनगर येथील हवा प्रदूषण प्रयोगशाळेतून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक साहित्य किंवा शाडू मातीपासून मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांनी अर्ज करताना आपणच मूर्तीकार असल्याचे हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू मातीने मूर्ती घडविणात्या मूर्तीकारांना त्यांच्या मंडपाबाहेर पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध आहेत, असा आशयाचा ३ बाय ५ फूट आकाराचा फलक लावणेही आवश्यक राहणार आहे, असे आयुक्त राव यांनी म्हटले आहे. महापालिकेने उपलब्ध करून दिलेली ही जागा नवरात्रोत्सव संपेपर्यंत वापरण्यासाठी देण्यात येणार असून त्यानंतर ती पुन्हा महापालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गणेशमूर्ती कार्यशाळा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ ते ७ जून २०२६ या कालावधीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील जैवविविधता उद्यान येथे शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून नोंदणीकरिता http://forms.gle/AHfh9rASdCEa9NrQ7 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले आहे.