१२८ पैकी ४१ नगरसेवक गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे, १३ करोडपती

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा मुद्दा कितीही गंभीर असला तरी, राजकारण्यांना अद्याप त्याचे भान आलेले नाही आणि मतदारांनाही त्याचे गांभीर्य उमगलेले नाही. त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या १२८ नगरसेवकांपैकी ४१ नगरसेवक गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत. दुसरीकडे, यंदाच्या पालिकेत दाखल होत असलेले १३ नगरसेवक करोडपती असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच या संस्थेने सादर केलेल्या अहवालात निवडणुकीत विजयी ठरलेल्या सर्व पक्षाच्या नगरसेवकांची आर्थिक मालमत्ता, वयोगट आणि त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्य़ांचा लेखाजोगा मांडण्यात आला आहे. गुंडांना पक्षामध्ये प्रवेश देण्यावरून भाजपवर ताशेरे ओढणाऱ्या शिवसेना पक्षातील गंभीर गुन्हे असलेल्या गुंड नगरसेवकांची यादी मोठी असल्याचे या अहवालात दिसून येत आहे.

सेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी २० नगरसेवक गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आहेत. भाजपच्या २३ नगरसेवकांपैकी ७ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३२ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत.

काँग्रेस पक्षातून अवघे तीन नगरसेवक निवडून आलेले असताना एका नगरसेवकावर गुन्हा दाखल आहे. इतर पक्षांतील निवडून आलेल्या तीन नगरसेवकांपैकी एका नगरसेवकावर गुन्हा दाखल असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १२८ नगरसेवकांपैकी ४१ नगरसेवक गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असून २८ नगरसेवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान तीन नगरसेवकांवर खुनाचा प्रयत्न, तीन नगरसेवकांवर अपहरणाचा गुन्हा तसेच शिवसेनेच्या मधुकर पावशे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

शिवसेनेच्या १४ नगरसेवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या ६, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६, काँग्रेस आणि इतर पक्षातील दोन नगरसेवकांचा गंभीर गुन्ह्य़ांमध्ये सहभाग असल्याचे हा अहवाल सांगतो.

मालमत्तेचे राजे नगरसेवक

गुन्ह्य़ांमध्ये सक्रिय सहभाग असताना निवडून आलेल्या काही नगरसेवकांची मालमत्ता देखील कोटींच्या घरात असल्याचे संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार निदर्शनास येत आहे. निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या १२८ नगरसेवकांपैकी १३ नगरसेवक करोडपती आहेत. या नगरसेवकांची सरासरी मालमत्ता ६ कोटी ७२ लाख एवढी असल्याचे स्पष्ट होत आहे. पाच नगरसेवकांनी मात्र आपली मालमत्ता दहा लाखापेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. तसेच २० नगरसेवकांनी २४ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न जाहीर केले असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

नगरसेवकांचे वयोमान

  • ७० महिला
  • ५८ पुरुष
  • २५-५० वर्षांचे १०२
  • ५१-७० वर्षांचे २२
  • २१-२४ वर्षांचे ४