ठाणे : ठाणे महापालिका स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यासाठी ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याने इच्छूकांच्या आनंदावर विरजण पडले होते. असे असले तरी मार्च महिन्यातच ही सभा पुन्हा आयोजित केली जाईल, या आशेवर इच्छूक होते. मात्र, पालिकेने येत्या १८ मार्च रोजी आयोजित केलेल्या सभेच्या पटलावर स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवडीचे विषय नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. यामुळे इच्छूकांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेची निवडणुक जानेवारी महिन्यात पार पडली. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक घेण्यात आली. यात शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर ५ मार्च रोजी स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणुकीत पराभूत झालेले आणि पक्ष नेत्यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांनी स्विकृत नगरसेवक पदासाठी पक्ष नेत्यांकडे लाॅबिंग सुरू केले होते.

त्याचबरोबर परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्य पदावर वर्णी लागावी म्हणून अनेक इच्छूक नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय सभेच्या पटलावर नव्हता मात्र, हा विषयही सभेच्या पटलावर आणण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू होती. असे असतानाच, ही सभा अचानकपणे रद्द करून पुढे ढकलण्यात आली. निवड करण्यात येणाऱ्या सदस्यांची नावे अंतिम झालेली नसल्यामुळेच सभा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. नवी मुंबई महापालिकेत पक्षीय संख्याबळाला वाकुल्या दाखवत बहुमताच्या जोरावर भाजपने परिवहन समितीचे १२ सदस्य निवडून आणले होते. या कृतीला प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांनी ठाण्याची निवडणुक रद्द केल्याची चर्चा होती.

ठाणे महापालिका स्विकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि पाच विशेष समिती सदस्यांची निवड करण्यासाठी ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याने इच्छूकांच्या आनंदावर विरजण पडले होते. दरम्यान, १८ मार्च रोजी पालिकेने सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. मात्र, या सभेच्या पटलावर सदस्य निवडीचे कोणतेही विषय नाहीत. शहरातील विविध विकास कामांचे प्रस्ताव पटलावर असल्याचे समजते. यामुळे सदस्य निवडीच्या सभेच्या आशेवर असलेल्या इच्छूकांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.