ठाणे – फेरीवाल्यांच्या पुनःसर्वेक्षणाच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी ठाणे महापालिकेकडे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने फेरीवाल्यांना सावध करत, सर्वेक्षणासाठी एक रुपयाही देऊ नका, पैसे मागणाऱ्यांची थेट तक्रार करा, असे स्पष्ट केले आहे. फेरीवाल्यांचे सुरू असलेले पुनःसर्वेक्षण पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, असे ठाणे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
फेरीवाला (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रेता विनियमन) अधिनियम, २०१४ चे कलम ३८ मधील तरतुदीनुसार राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) योजना, २०१७ तयार केली आहे. या योजनेतील तरतुदीनुसार पहिल्या सर्वेक्षणानंतर प्रत्येक पाच वर्षांनी पुनःसर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्व फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण हाती घेतले असून हे काम मे.विदसिद्ध इन्फोटेक या संस्थेमार्फत केले जात आहे.
शहरातील फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण सुरू झाले असून हे सर्वेक्षण पूर्णपणे मोफत आहे. मात्र, सर्वेक्षणाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येऊ लागल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. फेरीवाल्यांनी कोणालाही पैसे देऊ नयेत आणि पैशांची मागणी झाल्यास तात्काळ संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार करावी, असे आवाहनअतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाने केले आहे.
